
शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
जलजीवन मिशन अंतर्गत बोधेगाव व सात गावे नळ पाणी योजनेच्या सुधारीत कामास 14 कोटी 16 लाख रूपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वरदान ठरणारी बोधेगाव व 7 गावे नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत कामांस शासनाने जल जीवन मिशन अंतर्गत प्रशाकीय मान्यता दिली आहे. या योजनेत बोधेगाव, बालमटाकळी, चापडगाव, ठाकूर निमगाव, राणेगाव, शिंगोरी, अंतरवाली खु., दहीगाव शे या गावांचा समावेश आहे.
या योजनेत समाविष्ट गावांतील लोकसंख्येप्रमाणे 55 लिटर नळ पाणी दरडोही दर दिवस याप्रमाणे रुपये 3 हजार 915 रुपये इतका दरडोही खर्च अपेक्षित धरून शासनास 14 कोटी 16 लाख रुपयांचे अंदाजपत्रक सदर केले होते. त्यास शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांकरिता विहित केलेली मानके पूर्ण करून योजनेचे काम केले जाणार असल्याचे यावेळी आमदार राजळे यांनी सांगितले.
बोधेगाव व 7 गावे नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत कामांस प्रशाकीय मंजुरी दिल्याबद्दल पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब व नामदार शंकरराव गडाख यांचे मोनिका राजळे यांनी आभार मानले. शेवगाव तालुक्यातील पूर्व भाग हा अवर्षणप्रवण असून अनेक वेळा टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो, त्यामुळे सदर योजना पुर्ण होणे अत्यंत आवश्यक होते.
जलजीवन मिशन अंतर्गत बोधेगाव व 7 गावे नळ पाणी योजना ही या गावांतील नागरिकांना नक्कीच लाभदायी ठरणार आहे, या योजनेच्या सुधारीत कामांस प्रशाकीय मान्यता मिळाल्यामुळे बोधेगाव, बालमटाकळी, चापडगाव, ठाकूर निमगाव, राणेगाव, शिंगोरी, अंतरवाली खु., दहीगाव शे या गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची शाश्वत श्रोत उपलब्ध होणार असल्याने येथील नागरिकांनी आमदार मोनिकाराजळे यांचे आभार मानले.
या पाणीपुरवठा योजनेच्या सुधारीत कामास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे विभागीय मुख्य अभियंता यांनी तांत्रिक मान्यता दिली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव यांनी 5 एप्रिल रोजी छाननी करून प्राथमिक मंजुरी दिली होती. त्याप्रमाणे जल जीवन मिशन अंतर्गत बोधेगाव व 7 गावे नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत कामांस शासनाने प्रशाकीय मान्यता दिली असल्याचे आमदार राजळे यांनी सांगितले.