नळ पाणी योजनांच्या स्त्रोतांचे होणार जिओ टॅगिंग
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या अस्तित्वातील सर्व पाण्याच्या स्त्रोतांचे जिओ टॅगिंग करून पाणी गुणवत्ता परीक्षण आणि एफटीकेद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक गावातील पाच महिलांना याबाबतचे प्रशिक्षण 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ हे अभियान राबविले जाणार आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनाच्या जलजीवन सर्वेक्षण 2023 चा भाग असणारे ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. या अभियांना काल नगरला शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जलजीवन मिशन प्रकल्प संचालक सुरेश शिंदे, विस्तार अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, ग्रामसेवक, बीआरसी आणि सीआरसी जिल्हा कक्षातील सल्लागार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. सांगळे म्हणाले, ग्रामीण भागात हे अभियान राबविले जाणार आहे.
पाणी आणि आरोग्य याचा निकटचा संबंध आहे. ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज आहे. ज्या गावातून आलो आहोत, त्या ठिकाणी शुद्ध पाण्याबाबत आग्रह धरला, पाठपुरावा केला, तरी देखील मोठे काम होऊ शकणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने भूमिका पार पाडावी असे आवाहन डॉ. सांगळे यांनी यावेळी केले. तसेच रासायनिक व जैविक एफटीके किटद्वारे पाणी नमुने तपासणीचे प्रशिक्षण ऑक्टोप्स कंपनीचे प्रतिनिधी मनिष पाटील दिले.
एफटीके किटद्वारे कशा पद्धतीने पाण्याची तपासणी करावी, याबाबत प्रत्येक गावातील पाच महिलांना प्रशिक्षण देण्यात येऊन केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर त्यांची नावे अपलोड करण्यात येणार आहे. स्वच्छ जल से सुरक्षा या अभियानात वरिष्ठ वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी सर्व पाणी नमुन्याची तपासणी करावी, रेट्रो फिटिंग, नवीन योजनातील स्त्रोतांची जिओ टॅगिंग केली जाणार आहे.
या अभियानांतर्गत हर घर जल या मोबाईलद्वारे अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठा योजना, रेट्रो फिटिंगमधील पाणी पुरवठा योजना व नवीन योजनेतील स्रोतांची जिओ टॅगिंग पूर्ण करणे, सर्व स्त्रोतांची मान्सून पश्चात कालावधीमधील रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच सर्व पाणी नमुने जल सुरक्षका मार्फत गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.