श्रीरामपुरात अनेक भागात नळाला दूषित पाणी

स्वच्छतेचे तीनतेरा; रुग्णांच्या संख्येत वाढ; रुग्णालयांत गर्दी
पाणी पुरवठा
पाणी पुरवठा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील अनेक भागांमध्ये नळांना दूषित पाणी येत आहे. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून शहरातील कचरा उचलला जात नाही. दुर्गंधी पसरली जात असून नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उपचार घेण्यासाठी शहरातील जवळपास सर्वच रुग्णालये फुल्ल झाली आहेत. तरी पालिकेने स्वच्छतेची मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.

शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नळांना पिण्याच्या पाण्याऐवजी गटारीचे पाणी येत आहे. नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी रोज येऊन केवळ गटारीचे पाणी पाहून जातात. मात्र त्यांना अद्यापही गटारीचे पाणी कुठून नळांना जाते याचा शोध लावता आला नाही. त्यामुळे शहरातील विविध भागातही अशाचप्रकारे खराब आणि दुर्गंधीयुक्त पाणी जात आहे. लिकेज सापडत नाही लिकेज कुठे आहे हे तपासण्याचे काम चालू आहे, असे सांगून नागरिकांची बोळवण पालिकेकडून केली जाते.

शहरातील मार्केट यार्ड परिसर, अमरधाम रोड, वॉर्ड नं. 2 मध्ये विविध भागात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यावरची घाण कोणी उचलायची याबाबतचा प्रश्न नागरिकांना पडतो. घंटागाडीवाल्यांना सांगितले तर आम्ही केवळ घरातील कचराच घेतो रस्त्यावरचा कचरा ट्रॅक्टरवाले उचलतात. ट्रॅक्टरवाल्यांना विचारले तर आमचे काम नाही असे म्हणून लोकांना अपमानास्पद अशी वागणूक देत असतात. त्यामुळे कचरा उचला असे कोणाला सांगावे? असा प्रश्न नागरिकांपुढे पडलेला असतो. त्यामुळे ठिकठिकाणी कचरा दिवसेंदिवस तसाच पडून राहतो.

गटारी साफ केल्या जात नाहीत. गटारींवर अनेक ठिकाणी चेंबर आहेत ते चेंबर तर महिने महिने उघडले जात नाही. फोन करून बोलावले तरीही येत नाही. त्यामुळे नाल्या तुंबल्या जाऊन गटारीच्या पाण्याचा उग्र वास लोकांना सहन करावा लागत आहे. राजकीय काळात जे ठेकेदार होते तेच ठेकेदार आताही काम करत आहेत. मात्र उलट अधिकारी व कर्मचारी वर्ग त्यांना सांभाळून घेत असल्यामुळे ठेकेदार शहरात व्यवस्थित काम करताना दिसत नाहीत. कंत्राटी कर्मचारीही व्यवस्थित काम करताना दिसत नाही. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. मुख्याधिकारी व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी शहरातील पिण्याचे पाणी, घाणीचे साम्राज्य तसेच तुंबलेल्या गटारींच्या ज्या तक्रारी येत असतात त्या तक्रारीची दखल घेवून श्रीरामपूर शहरातील घाण तातडीने दूर करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com