
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
‘जल जीवन मिशन ’अंतर्गत गावागावांत प्रति व्यक्ती 55 लीटरप्रमाणे बाराही महिने स्वच्छ पाणीपुरवठा घरोघरी करण्यात येत आहे. संपूर्ण गावात योग्य अंमलबजावणी झाल्यानंतर आता संबंधित गाव ‘हर घर जल’ घोषित करण्यात येणार आहे. त्यासाठी गावात जावून ग्रामसभा घेणे, शासनाच्या पोर्टल, मोबाईल अॅपवर नोंदणी करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 229 गावे 100 टक्के नळ जोडणी पुर्णत्वाकडे गेले असल्याचे निर्देश जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक सुरेश शिंदे यांनी सांगितले.
गावे ‘हर घर जल घोषित’ करण्याबाबतची एक दिवशीय कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेस कार्यकारी अभियंता आनंद रूपनर, उपअभियंता विठ्ठल माने, सुनील साळुंके, श्रीरंग गडधे, रवींद्र पिसे आदीं उपस्थित होते. शिंदे म्हणाले,‘नळ जोडणी पुर्णत्वाकडे गेलेल्या गावांना पंचायत समिती स्तरावरील तांत्रिक अधिकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी व अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष भेटी देऊन खात्री करण्यात यावी.
यातील जास्तीत जास्त गावे 29 जुलैपर्यंत आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत हर घर जल म्हणून घोषित करण्यात यावी. यासाठी आवश्यक ती कार्यवाही विहित पध्दतीने करावी. जी गावे हर घर जल म्हणून घोषित होतील, त्या गावात हर घर जल महोत्सव साजरा करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.