डॉ. तनपुरे कारखान्याकडे 5 हजार हेक्टर उसाची नोंद - ढोकणे

कार्यक्षेत्रातील 13 गटात युद्धपातळीवर उसाच्या नोंदी सुरू
डॉ. तनपुरे कारखान्याकडे 5 हजार हेक्टर उसाची नोंद - ढोकणे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्याची कामधेनू समजल्या जाणार्‍या डॉ. बा. बा. तनपुरे कारखान्याचे यंदा विक्रमी गाळप करण्यासाठी सर्व संचालक मंडळ,

अधिकारी व कामगार हे गटागटात फिरून ऊस नोंदीसाठी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, शेतकर्‍यांमधूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याने आतापर्यंत 5 हजार हेक्टरची नोंद झाली असून उर्वरित शेतकर्‍यांनीही आपल्या नोंदी करून घ्याव्यात, असे आवाहन डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांनी केले.

ढोकणे म्हणाले, डॉ.तनपुरे कारखान्याच्या विक्रमी गाळपासाठी राहुरी, बारागाव नांदूर, उंबरे, वांबोरी, डॅम फाटा, टाकळीमिया, आरडगाव, मानोरी, मालुंजे, मांजरी, देवळाली प्रवरा, कोल्हार, बेलापूर या 13 गटात ऊस नोंदी युद्धपातळीवर सुरू आहेत.

त्यासाठी कारखान्याचे गटा-गटातील सर्वच संचालक हे स्वतः कामगारांसोबत बांधावर जाऊन शेतकर्‍यांना आवाहन करत असून कारखान्याचे कामगार व अधिकारी उसाची पाहणी करून त्याच्या नोंदी घेत आहेत.

सर्वच गटातील शेतकर्‍यांमधून ऊस नोंदीला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे राजकीय जोडे बाजूला ठेवून अनेक शेतकर्‍यांनी देखील मोठ्या मनाने राहुरी कारखान्याकडे ऊस नोंदी केल्या आहेत.

त्यामुळे 25 जुलै ते 3 सप्टेंबर या कालावधीत 5 हजार हेक्टर क्षेत्राची नोंद पूर्ण झाली असून अजून 3 हजार हेक्टरच्या नोंदी होण्याचा अंदाज आहे. याकामी संचालक मंडळ व कामगारांचे सुरू असलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही ढोकणे यांनी काढले.

दरम्यान, खासदार डॉ. सुजय विखे यांनी डॉ.तनपुरे कारखाना यंदा विक्रमी भाव देणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची डॉ.तनपुरे कारखान्याला ऊस देण्याची इच्छा आहे.

शिवाय पुढीलवर्षी अतिरिक्त ऊस होणार असल्याने संकटकाळात ऊस तोडणीसाठी आपला हक्काचा कारखाना म्हणून राहुरीला ऊस देण्याची शेतकर्‍यांची मानसिकता आहे. त्यामुळे यंदाचे गाळप हे विक्रमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com