ढोकणे यांचे नाव ‘फायनल’ उपाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
सार्वमत

ढोकणे यांचे नाव ‘फायनल’ उपाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

डॉ. तनपुरे कारखान्याच्या पदाधिकारी निवडीला सोमवारचा मुहूर्त

Arvind Arkhade

उंबरे|वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड सोमवार दि. 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक नामदेवराव ढोकणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून आता उपाध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते? याकडे सहकारासह राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. तर उपाध्यक्षपदासाठी इच्छुक संचालकांनी जोरदार फिल्डिंग लावल्याने या पदासाठी जोरदार रस्सीखेच होणार असल्याचे संकेत आहेत.

मागील महिन्यात डॉ.तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील व उपाध्यक्ष शामराव निमसे यांनी ठरल्याप्रमाणे आपआपले राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता या निवडी होणार असून त्यासाठी सोमवारचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. खा. डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. तनपुरे कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला.

त्यामुळे राहुरी तालुक्यातील बाजारपेठेचे अर्थचक्र पुन्हा वेगाने फिरू लागले. मात्र, मागील वर्षी डॉ. तनपुरे कारखाना गळीताअभावी बंद होता. यावर्षी पुन्हा कारखाना सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. उसाची नोंदणीही सुरू झाली असून राहुरी तालुक्यात गाळपासाठी पुरेसा ऊस असल्याने कारखान्याच्या गळीतासाठी कोणतेही अडथळे येणार नसल्याने हा गाळप हंगाम यशस्वी करण्याचा दावा संचालकांनी केला आहे.

मावळते अध्यक्ष उदयसिंह पाटील व उपाध्यक्ष शामराव निमसे या तरुण पदाधिकार्‍यांनी अनुभव गाठीशी नसतानाही कारखान्याची धुरा सुरळीतपणे सांभाळली. मध्यंतरी कारखान्यावर जिल्हा बँकेचे आर्थिक आरिष्ट आल्यानंतर सर्वच संचालकांनी माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांची समक्ष भेट घेऊन त्यांना कर्जाच्या मुदतवाढीबाबत साकडे घातले.

त्यावर माजी आ. कर्डिले यांनीही मोठे योगदान देऊन कारखान्याचे आर्थिक गंडांतर दूर केले. आता नवीन पदाधिकारी निवड होणार असल्याने शेतकर्‍यांसह तालुक्यातील बाजारपेठेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

सोमवार दि. 17 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता डॉ.तनपुरे कारखान्याच्या कार्यस्थळावर संचालकांच्या बैठकीत ही निवड होणार आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक सह संचालक राजेंद्रकुमार जोशी यांच्या अधिपत्याखाली ही निवड होणार आहे. या निवडीकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com