तनपुरे कारखान्यासाठी डेक्कन शुगर इंटरेस्टेड

निविदा प्रक्रियेबाबत बँकेच्या भूमिकेवर शंका पाचपैकी चौघांनी निविदाच भरली नाही
डॉ. तनपुरे कारखाना
डॉ. तनपुरे कारखाना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एकेकाळी राज्यात नावलौकीक असणार्‍या आणि राहुरी तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून या निविदा प्रक्रियेला यवतमाळच्या डेक्कन शुगरने प्रतिसाद देत निविदा भरली असल्याची माहिती कारखान्यासाठी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकार्‍याने दिली.

दरम्यान, तनपुरे कारखान्यासाठी बँकेने भाडेतत्वासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेच्या कालावधीत नगर, पुणे आणि यवतमाळ येथील साखर कारखानदार अथवा संस्थांनी निविदा अर्ज विकत नेलेले होते. मात्र, यापैकी यवतमाळच्या डेक्कन शुगरने 30 ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत निविदा भरली आहे. दुसरीकडे जिल्हा बँकेने कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यांकडून निविदा प्रक्रियेबाबत गोपनियता पाळण्यात येत असून ही गोपनियता कशासाठी पाळली जात आहे, याबाबत बँकेच्या वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे तनपुरे कारखाना निविदा प्रक्रियेबाबत संशयाचे वातावरण तयार झाले आहे.

राहुरीच्या डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यास जिल्हा बँकेचा वित्तपुरवठा आहे. 2013 साली कारखान्यावर 60 कोटींच्या कर्जाची थकबाकी होती. तेव्हा, बँकेने कारखान्याची चल-अचल मालमत्ता जप्त केली होती. 2016 साली कारखान्याची निवडणूक प्रक्रिया झाली. त्यात, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील संचालक मंडळ विजयी झाले. बँकेचे संचालक तत्कालीन आ. शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. 2017 साली 90 कोटी कर्जाचे पुनर्गठन होऊन, अकरा वर्षांसाठी मुद्दल, व्याजाचे हप्ते पाडून देण्यात आले. बँक व कारखाना व्यवस्थापनामध्ये द्विपक्षीय करार होऊन बँकेने जप्त केलेली मालमत्ता संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आली.

सलग तीन वर्षे बंद पडलेला कारखाना 2017-18 पासून सुरू झाला. 2019-20 मध्ये ऊस टंचाईमुळे कारखाना बंद राहिला. दरम्यान, सत्ताधारी मंडळाने सात वर्षांच्या काळात चार वर्षे कारखान्याचा ऊस गाळप हंगाम पार पडला होता. त्यानंतर संचालक मंडळाची मुदतवाढ संपल्याने कारखान्यावर पुन्हा प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, थकीत कर्जापोटी बँकेतर्फे कारखान्याची मालमत्ता पुन्हा जप्त करण्यात आली. त्यानंतर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा ठराव नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गत महिन्यात मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर यासंदर्भात निविदाही प्रसिध्द करण्यात आली. दुसरीकडे कारखाना व्यवस्थापनाने चार वर्षे उसाचे गाळप करून 48 कोटी रुपये बँकेला कर्जापोटी अदा केले. परंतु, सर्व रक्कम व्याजात जमा झाली. कर्ज पुनर्गठण करताना 90 कोटींची मुद्दल कायम राहिली. त्यावर ऑगस्ट 2023 अखेर 34 कोटी 72 लाख रूपये व्याजासह 124 कोटी 75 लाख रूपये कर्जाची थकबाकी झाली आहे.

यामुळे अखेर बँकेच्या संचालक मंडळाने आता कारखान्यावरील कर्ज वसूल करण्यासाठी कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यात ठरवून दिलेल्या मुदतीत पाच निविदाधारक यांनी अर्ज नेले. त्यातील यवतमाळच्या डेक्कन शुगरची निविदा 30 ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झाल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी एन. एस. पाटील यांनी दिली.

बँकेवर दबाब ?

सुरूवातीपासून जिल्हा बँकेची तनपुरे कारखान्याबाबतची भूमिका संशास्पद आहे. आता बँकेने कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आलेल्या निविदांची माहिती देण्यास प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आले. ही माहिती देण्यास बँक का टाळाटाळ करते, याबाबत बँकेच्या वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा आहेत. या प्रकरणात अधिकार्‍यांवर कोणाचा तरी दबाब आहे की, अधिकारी मनमर्जीप्रमाणे वागत बँकेसह कारखान्याचे नुकसान करत आहेत आणि याला जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर बँकेचे संचालक मंडळ काय कारवाई करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com