टँकर घोटाळा संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

तपासासाठी पोलिसांची कोठडीची मागणी
टँकर घोटाळा संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यात झालेल्या टँकर घोटाळ्यातील संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर टँकर घोटाळ्यातील संशयितांच्या विनंतीवरून अहमदनगर सत्र न्यायालयाकडून तात्पुरता अटकपूर्व जामीन दिलेला होता. तो कायम करण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता.

या प्रकरणातील मूळ तक्रारदार यांनी या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करणारा हस्तक्षेप अर्ज न्यायालयासमोर दाखल केला होता. पोलिसांनीही या प्रकरणात बनावटगिरीची वाढीव कलमे लावून संशयितांचा अटकपूर्व जामीन कायम करण्याला विरोध केला. अतिरीक्त सत्र न्यायाधीश माधुरी बरालिया यांच्यासमोर याबाबत सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने यातील सर्व संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

बनावट कागदपत्रे तयार करून सार्वजनिक निधीचा अपहार करणे, शासनाची फसवणूक करणे असे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत. संशयितांकडून गुन्ह्यासाठी वापरलेला मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे. त्यांनी पुरावे नष्ट करू नयेत तसेच फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दबाव आणू नये म्हणून व गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्यामुळे तो कसा घडवला याबाबत तपासात पोलिसांना आरोपींच्या कोठडीची गरज असल्याचे म्हटले आहे.

पारनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पारनेर येथील साई सहारा इंफ्रा अँण्ड फॅसीलीटी प्रा . लि . या कंपनीला जिल्हा प्रशासनाने सन 2018 - 19 मध्ये कंत्राट दिले होते. या कंपनीने पाणीपुरवठा करताना मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप निघोज येथील लोकजागृती सामाजिक संस्थेने केला आहे. या गुन्ह्यातील संशयितांमध्ये सहारा कंपनीचा अध्यक्ष सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके, दादाभाऊ पठारे, नितीन अडसुळ, विठ्ठल पवार, विठ्ठल गाजरे, अभय औटी यांचा समावेश आहे. तक्र्रारदार लोकजागृती सामाजिक संस्थेच्यावतीने अ‍ॅड. नवनाथ गर्जे तर सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. अर्जुन पवार यांनी बाजू मांडली.

Related Stories

No stories found.