तांदुळवाडीतून 49 तर वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीसाठी 38 उमेदवारी अर्ज

ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

कोंढवड |वार्ताहर|Kondhwad

राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या तांदुळवाडी ग्रामपंचायतचे विभाजन होऊन वाघाचा आखाडा व तांदुळवाडी या स्वतंत्र झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे दोन्ही गावांतील निवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.

अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत तांदुळवाडी ग्रामपंचायतच्या 13 जागांसाठी 49 तर वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी 38 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.काल दि. 19 जुलै रोजी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने तहसील कार्यालय आवारामध्ये उमेद्वारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

तांदुळवाडी गावात पाच प्रभाग असून 3245 मतदार हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर वाघाचा आखाडा या नविन गावात तीन प्रभाग असून 1220 मतदार आहेत. आज बुधवार दिनांक 20 जुलै रोजी नामनिर्देशित पत्राची छाननी होणार असून शुक्रवार 22 जुलै रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असणार आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र हे स्पष्ट होणार आहे. 4 ऑगस्ट रोजी मतदान तर मतमोजणी 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. तांदुळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून जी.एन. अनारसे तर शिंदे हे वाघाचा आखाडा ग्रामपंचायत निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com