तांदुळवाडीतील दूध भेसळखोर मोकाट

पोलिसांची संशयास्पद भूमिका
तांदुळवाडीतील दूध भेसळखोर मोकाट

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

दूध भेसळीचे आगार बनलेल्या राहुरी तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून दूध भेसळीवर कारवाई केली. यानंतर काष्टी येथे ही कारवाई होऊन या प्रकरणात चार जणांना अटक झाली. मात्र राहुरी येथील आरोपी अद्यापही मोकाटच फिरत असल्याने राहुरी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे दि.9 मार्च रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन ठिकाणी छापा टाकला यामध्ये आरोग्याला अत्यंत घातक असलेले लाईट लिक्विड पॅराफिन, व्हे. पावडर, कृत्रिम दूध असा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच राहुरी पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर संबंधित भेसळीचे दूध तयार करणारे आरोपी भेसळी साठी लागणारा माल, साहित्य कोठून खरेदी करत होते. तसेच भेसळीचे दूध कोणाला विकत होते. परिसरातील यामध्ये अजून कोण-कोण सहभागी आहेत. याचा उलगडा पोलीस तपासात होणे गरजेचे होते. मात्र घटना घडून सुमारे 15 दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप पोलिसांना आरोपीच सापडत नाहीत?, पोलीस नातेसंबंध जपत आहेत का?, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच या प्रकरणात चार जणांना अटक झाली.

कृत्रिम दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कोठून घेतले, दूध कोठे विकले याची चौकशी सुरू झाली. परंतु राहुरीत कारवाई करण्यास पोलिसांची दिरंगाई कशामुळे? असा सवाल निर्माण झाला आहे. राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध भेसळ सुरू असून अन्न व औषध प्रशासनाने आता यामध्ये चांगले लक्ष घातले असल्याचे दिसते. राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध भेसळ रोखण्यासाठी सरकार कडक उपाययोजना करणार असल्याचे नुकतेच विधान भवनात स्पष्ट केले आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील दुधात भेसळ करणार्‍यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे असे सांगितले आहे.

सत्ताधारी व विरोधी पक्ष दूध भेसळीवर गंभीर असताना राहुरी तालुक्यात मात्र एवढी मोठी भेसळ सुरू असताना तसेच कारवाई झालेली असताना पोलीस आरोपींना का पाठीशी घालत आहेत याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com