दादासाहेब पठारे अध्यक्ष तर संभाजी रोहोकले, सुरेश थोरात सदस्य

दादासाहेब पठारे अध्यक्ष तर संभाजी रोहोकले, सुरेश थोरात सदस्य

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या पुनर्जीवित केलेल्या हंगामी समितीच्या नियुक्तीची मुदत संपल्याने

ही समिती बरखास्त करून प्रशासकाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दादासाहेब भाऊसाहेब पठारे यांची अध्यक्षपदी तर संभाजी देवराम रोहोकले व सुरेश रावसाहेब थोरात यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

पारनेर तालुका दूध उत्पादक संघाचे 16 नोव्हेंबर 2017 रोजी पुनर्जीवन करण्यात आले होते. या नंतर एक वर्षाच्या कालावधीकरिता हंगामी समितीची नियुक्ती करण्यात आलेली होती. सदर हंगामी नियुक्त समितीची मुदत 15 नोव्हेंबर 2018 रोजी समाप्त झाली आहे. कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या नियमानुसार निवडणूक घेणे आवश्यक राहील असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते मात्र, याबाबत कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात आमदार निलेश लंके यांनी दुग्ध पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे संस्थेचा गैरकारभार व प्रशासक नियुक्तीची मागणी केली होती.

त्यानुसार लेखापरीक्षक एन.ए.ठोंबरे यांनी त्यांची नियुक्ती केली होती. त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालात नारायण गव्हाण येथील शासकीय शीतकरण केंद्र खरेदी पोटी शासकीय दूध संस्था यांच्याकडे 16.86 लाख इतक्या खरेदी रकमेचा भरणा 28 सप्टेंबर 2007 रोजी केलेला असून आज अखेर मालमत्तेचे हस्तांतरण व खरेदीखत संघाने अद्याप केलेले नाही.

संघाच्या मालकीचे सुपा येथील शीतकरण केंद्र बर्‍याच कालावधीपासून बंद असल्याने तेथील यंत्रसामुग्री निरुपयोगी झालेले आहे त्यामुळे संघाने सर्वसाधारण सभेत ठराव करून ही सामग्री भंगारात विकण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती मात्र,याबाबत प्रक्रिया राबवलेली नाही.

सहकारी संस्थेच्या तरतुदीनुसार कोणत्याही संस्थेच्या समितीचा पदावधी संपला आहे म्हणून नवीन समिती पदग्रहण करेपर्यंत संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी संस्थेचे तीन पेक्षा अधिक सदस्य मिळून बनलेली समिती किंवा एक किंवा अधिक अधिकारी संस्थेचे सभासद असण्याची आवश्यकता नाही अशी तरतूद आहे.

पारनेर दूध संघाचा पुर्नजीवीत झाल्यानंतर नेमण्यात आलेल्या हंगामी समितीचा कालावधी 15 नोव्हेंबर 2018 रोजी संपुष्टात आलेला असल्याने हंगामी समितीने निवडणूक कार्यवाही करणे आवश्यक असताना ती केलेली नसल्याने राज्याच्या पशु व दुग्ध विकास मंत्रालयाने नव्या प्रशासकांची निवड केली आहे. नव्या प्रशासक समितीमध्ये दादासाहेब पठारे, संभाजी रोहोकले ,सुरेश थोरात यांची निवड करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com