तळेगाव सोसायटी निवडणूक न्यायप्रविष्ठ

तब्बल 28 जणांना कारणे दाखवा नोटीस
तळेगाव सोसायटी निवडणूक न्यायप्रविष्ठ

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या तळेगाव दिघे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीस आव्हान देणारा दावा दाखल करण्यात आला आहे. याप्रश्नी लेखी म्हणणे सादर करण्यासाठी संबंधित अधिकारी, विजयी व पराभूत उमेदवार अशा तब्बल 28 जणांना कोपरगाव येथील सहकारी न्यायालय नं. 2 यांच्यामार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे तळेगाव सोसायटीची निवडणूक न्यायप्रविष्ठ झाली आहे.

तळेगाव दिघे सोसायटीच्या निवडणुकीत बिरोबा शेतकरी विकास मंडळाने सर्व 13 जागा जिंकून विजय संपादन केला होता. त्यावर पराभूत झालेल्या सिद्धेश्वर बिरोबा शेतकरी विकास मंडळाच्या नेत्यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आक्षेप घेतला होता. तशी तक्रार संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सिद्धेश्वर मंडळाचे पराभूत उमेदवार अण्णासाहेब चांगदेव दिघे, रविंद्र कान्होबा दिघे व रामदास लक्ष्मण भागवत यांनी याप्रकरणी कोपरगाव येथील सहकारी न्यायालय नं. 2 मध्ये ल.मु.नं. 61/2022 नुसार निवडणुकीस आव्हान देणारा दावा दाखल केला.

त्यामुळे कोपरगाव येथील सहकारी न्यायालयाचे न्यायाधीश यांनी सोसायटीचे सचिव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगर, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी - तळेगाव दिघे सोसायटी सहित निवडणुकीतील विजयी व पराभूत उमेदवार अशा 28 जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तळेगाव सोसायटीची झालेली निवडणूक न्यायप्रविष्ठ झाल्याने याप्रकरणी आता काय निकाल लागतो ? याकडे सभासद तसेच ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.