तळेगाव दिघेत मटक्याचा अड्डा उद्ध्वस्त

तळेगाव दिघेत मटक्याचा अड्डा उद्ध्वस्त

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायत समोर व देवीच्या मंदिराच्या पाठीमागे एका शेडमध्ये करोना लॉकडाऊन काळातही सुरु असलेला मटक्याचा अड्डा गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास उध्वस्त करण्यात आला. संगमनेर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत प्रशासन व पोलिसांनी ही कारवाई केली.

करोना लॉकडाऊन पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे हे तळेगाव दिघे येथे पाहणी करण्यासाठी गुरुवारी आले होते. दरम्यान दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांना ग्रामपंचायत समोर व देवीच्या मंदिराच्या पाठीमागे एका शेडमध्ये गर्दी दिसली. सदर ठिकाणी जावून श्री. शिंदे यांनी पाहणी केली असता मटक्याचा अड्डा सुरु असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र कुणीतरी अधिकारी आल्याचे लक्षात येताच मटका अड्डा चालक व मटका खेळणार्‍यांनी तेथून पळ काढला.

दरम्यान गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी पोलिसांना पाचारण केले. सदर शेड हे सरकारी जागेत असल्याने व त्याठिकाणी मटक्याचा अड्डा चालविला जात असल्याने सदर मटका अड्डा शेड तात्काळ उध्वस्त करण्याच्या सूचना तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आंबरे यांना दिल्या. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आंबरे यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या मदतीने व पोलीस हेड. कॉ. लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर यांच्या उपस्थितीत सदर गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मटका अड्डा शेड उध्वस्त केले. तळेगाव दिघे येथील एक मटका अड्डा शेड प्रशासनाने उध्वस्त केल्याने मटका अड्डा चालक व मटका खेळणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com