तळेगाव दिघेतील दगड खाणीतील स्फोटामुळे घरांना तडे

विषारी वायुमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
तळेगाव दिघेतील दगड खाणीतील स्फोटामुळे घरांना तडे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग नव्याने निर्माण होत आहे. धोत्रे ते कोर्‍हाळे या 29.39 किलोमीटर रस्त्यासाठी लागणार्‍या दगड व खडीसाठी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील हसनाबाद येथे उभारण्यात आलेल्या दगड खाण व खडी क्रेशर प्रकल्पांतर्गत उत्खननादरम्यान मोठ-मोठे स्फोट केले जात असून या स्फोटामुळे स्थानिक रहिवाश्यांच्या घरांना हादरे बसून मोठे नुकसान होत आहे. तरी सदर दगड खाण क्रेशर तात्काळ बंद करण्याची मागणी स्थानिक रहिवाश्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हसनाबाद येथील गट नंबर 313 व 314 मध्ये कंत्राटदार कंपनीने दगड खाण व खडी क्रेशरचा प्रकल्प उभा केला आहे. सदर दगड खाणीतून मोठ्या प्रमाणावर उत्खनन चालू असून सदर उत्खननादरम्यान मोठमोठे स्फोट केले जातात. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशी घरांना मोठ्या प्रमाणावर हादरे बसत असून घरांच्या भिंतींना तडे जाऊन घरे खिळखिळी झाली आहेत.

तसेच स्फोटादरम्यान बाहेर पडणारा विषारी वायु, धूर, दगड व खडी क्रेशरमधून बाहेर पडणारी धूळ यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य व शेतपीक धोक्यात आले आहे. खाणीतील स्फोटादरम्यान मोठमोठे दगड उडून रहिवाशी वस्तीनजीक येऊन पडत असून त्यातून स्थानिक रहिवाशांना गंभीर इजा तसेच जीवीतहानी होऊ शकते. खाणीतील विषारी वायु व धुळीमुळे स्थानिकांना गंभीर श्वसनाचे विकार जडू शकतात तसेच त्यांच्या शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहेत.

सदरचे दगडखाण उत्खनन हे लागवड योग्य शेती क्षेत्रात दिल्याचे समजते तसेच दगड खाणीपासून लगतच्या रहिवाशी वस्तीचे अंतर हे 180 मीटर पेक्षा कमी आहे. तसेच सदरची खाण नैसर्गिक जलस्त्रोत असलेल्या ओढ्याला लागून असून त्यामुळे नैसर्गिक ओढ्याचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनिनियम) नियम 2013, नुसार दगड खाण उत्खननासाठी परवानगी देतेवेळी स्थानिक गावातील ग्रामसभेची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

परंतु कुठलीही ग्रामसभा न घेता, कुठलाही ठराव न घेता सदर खडी क्रेशर प्रकल्पाला ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला दिला आहे. सदर प्रकल्पाकडून होत असलेल्या त्रासाबद्दल स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी शासकीय यंत्रणेकडे तक्रारी दाखल केल्या. मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

सदरच्या दगड खाणीतील बेकायदेशिर उत्खननाबाबत वेळीच दखल घेऊन कारवाई न झाल्यास दगडखाणीतून निर्माण होणार्‍या विषारी वायु, धूळ, व धूर यामुळे भविष्यात जीवीतहानी देखील होऊ शकते. शेती नष्ट होऊ शकते, तरी सदर दगड खाण व खडी क्रेशर तात्काळ बंद करण्यात यावे, तसेच स्थानिक रहिवाशांचे जे नुकसान झाले आहे, त्याची सदरील कंत्राटदार कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनावर विठ्ठल जगताप, निवृत्ती जगताप, संतोष जगताप, मारुती जगताप, मनाबाई जगताप, भाऊसाहेब जगताप, लक्ष्मण जगताप, शंकर जगताप, कारभारी जगताप, सोमनाथ वामन, ज्ञानदेव वामन, दत्तात्रय वामन, वंदना वामन, संजय वामन, नारायण भागवत, चांगदेव भागवत, सूर्यभान दिघे, विलास जगताप, सविता वामन, माधव मते, रावसाहेब जगताप, बापू जगताप आदींच्या सह्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com