तलाठ्यांच्या वाळू हप्त्यांचे आकडे आले चव्हाट्यावर !
सार्वमत

तलाठ्यांच्या वाळू हप्त्यांचे आकडे आले चव्हाट्यावर !

येसवडीच्या बळीराम कांबळे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

Arvind Arkhade

कर्जत|तालुका प्रतिनिधी|Karjat

तालुक्यातील येसवडी येथील बळीराम अंकुश कांबळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन तालुक्यातील तलाठी वाळू माफियांकडून वसुली करीत असल्याची तक्रार केली आहे. दखल न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

तहसीलदारांना 2 जुलै रोजी निवेदन देऊन या प्रकाराची पाहणी करावी अशी मागणी करण्यात आली. मात्र त्याची दखल घेतली नसल्याने कलेक्टर कार्यालयाकडे तक्रार केली आहे. या निवेदनात तलाठी घेत असलेल्या हप्त्यांचे आकडे देण्यात आले असल्याने महसूल विभागाची लक्तरे वेशीवर टांगली असल्याचे दिसत आहे.

कांबळे यांनी गावागावांतील तलाठी घेत असलेल्या रकमा निवेदनात देऊन ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण ही तक्रार केली असून तलाठ्याच्या सांगण्यावरून धमक्या येत आहेत.

तलाठ्यामार्फत हल्ला होण्याची संकेत मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दखल न घेतल्यास 16 जुलैपासून कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. बारडगाव, येसवडी, ताजू, बेलवंडी, कारखाना येथील तलाठ्यांचे हे आकडे असून ते 30000 ते 70000 रुपयांच्या दरम्यान असल्याचे निवेदनात नमूद केलेले आहे.

संबंधित तलाठ्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडून खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

- नानासाहेब आगळे, तहसीलदार, कर्जत

Deshdoot
www.deshdoot.com