मंडल अधिकार्‍यापाठोपाठ मद्यधुंद तलाठ्यालाही मारहाण

मंडल अधिकार्‍यापाठोपाठ मद्यधुंद तलाठ्यालाही मारहाण

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील वाळू तस्करांनी एका मंडलाधिकार्‍याला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच काल रात्री पुन्हा एकदा महसूल कर्मचार्‍याला मारहाण झाली आहे. शहरालगतच्या एका गावामध्ये कार्यरत असलेल्या कामगार तलाठ्याने मद्यधुंद अवस्थेत हॉटेल चालकासोबत अरेरावी केल्याने या हॉटेल चालकाने या तलाठ्याला बेदम चोप दिल्याची घटना काल रात्री नाशिक-पुणे महामार्गावरील वेल्हाळे शिवारातील एका हॉटेलमध्ये घडली.

संगमनेर तालुक्यातील कर्‍हे घाटामध्ये दोन दिवसांपूर्वी एका मंडलाधिकार्‍याला मारहाण झाली होती. काही वाळूतस्करांनी ही मारहाण केली होती. काल रात्री महसूल खात्याच्या तलाठ्याला मारहाणीला सामोरे जावे लागले. मंगळवारी संध्याकाळी आपल्या एका सहकार्‍याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आटोपून हा कामगार तलाठी आपल्या काही सहकार्‍यांसह नाशिक-पुणे महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता.

या हॉटेलमध्ये तलाठ्याने भरपूर मद्यप्राशन केले. जेवण झाल्यानंतर त्याने बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. मद्यधुंद अवस्थेत त्याने हॉटेल चालकाशी अरेरावी केली. यामुळे संतापलेल्या या हॉटेल चालकाने या कामगार तलाठ्याला बेदम चोप दिला.

काल रात्री त्याला मारहाण झाल्याची माहिती समजतात त्याच्या संघटनेच्या काही सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर हे प्रकरण शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. रात्री पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तलाठी दिवसभर कार्यालयात फिरकलेच नव्हते. काहीजणांनी आपल्या कामासंदर्भात तलाठी यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉटरिचेबल होते. दरम्यान या घटनेत हॉटेल चालकालाही मोठी दुखापत झाली असून तो शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या हॉटेल चालकाने तलाठी विरुद्ध गुन्हा दाखल करू नये यासाठी प्रयत्न सुरू होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com