तलाठी, अंगणवाडी सेविकेचे परस्पर विरोधी गुन्हे

श्रीगोंद्यातील मुंढेकरवाडी येथे उत्पन्नाच्या दाखल्यावरून प्रकार
तलाठी, अंगणवाडी सेविकेचे परस्पर विरोधी गुन्हे

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथील तलाठी कार्यालयात दाखला घेण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेचा विनयभंग तलाठी यांनी केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तर तलाठी रासकर यांनीही या महिलेच्या विरोधात तलाठी कार्यालयात येऊन शिवीगाळ करत, मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अंगणवाडी सेविके विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत अंगणवाडी सेविकेने म्हटले आहे की, 27 जून रोजी तलाठी कार्यालयात उत्पन्नाचा दाखला मागितला असता तलाठी अशोक रासकर यांनी वाईट हेतूने हातावर हात फिरवत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत कोणाला सांगितले तर काटा काढण्याची धमकी दिली. त्यांच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तलाठी अशोक रासकर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

तलाठी अशोक रासकर यांनी अंगणवाडी सेविके विरोधात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अंगणवाडी सेविकेने उत्पन्नाचा दाखला मागितला. त्यावर त्यांना मानधन किंवा पगार पत्रक मागितले असता त्याचा राग अनावर होऊन त्या महिलेने शिविगाळ करत कॉलर पकडून धक्का दिला. सरकारी कामात अडथळा आणला व तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत तुमची नोकरी घालवीन, अशी धमकी दिली. याबाबत पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.या परस्परविरोधी फिर्यादीमुळे सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाच्या पद्धतीवर तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com