टाकळीभानच्या विठ्ठल देवस्थान विश्‍वस्त मंडळाची राजीनामा देण्यास सहमती

बैठकीस पाच विश्‍वस्त हजर
टाकळीभानच्या विठ्ठल देवस्थान विश्‍वस्त मंडळाची राजीनामा देण्यास सहमती

टाकळीभान (वार्ताहर) -

येथील विठ्ठल देवस्थानची 88 एकर जमीन देवस्थानच्या ताब्यात मिळावी व विश्‍वस्त मंडळ बरखास्त करून नवीन विश्‍वस्त मंडळ नियुक्त करावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब शिंदे यांनी धर्मदाय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

सदर निवेदनाची प्रत ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आल्याने ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी प्रमुख मोजक्या कार्यकर्त्यांसह देवस्थानच्या विश्‍वस्तांना विचारविनिमय करण्यासाठी निमंत्रीत केले होते. या बैठकित ग्रामस्थ जो निर्णय घेतील, त्यानुसार विश्‍वस्त मंडळ एकत्रित राजीनामे देण्यास तयार असल्याचे मत व्यक्त केले.

येथील विठ्ठल देवस्थानच्या सुमारे 88 एकर बागायत जमिनीचा प्रश्‍न गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहे. ही जमीन अनेक वर्षांपासून खाजगी कुटुंबांकडे कसायला असल्याने देवस्थानला जमिनीच्या उत्पन्नाचा लाभ मिळत नसल्याने देवस्थानचा विकास खुंटला आहे.

विश्‍वस्त मंडळ विकासासाठी कूचकामी ठरत असल्याने विश्‍वस्त मंडळच बरखास्त करून सर्व जमीन कसणार्‍या कुटुंबांकडून काढून घेऊन देवस्थानकडे वर्ग करावी, नव्याने तयार करण्यात येणार्‍या विश्‍वस्त मंडळाकडे देवस्थानचे कामकाज सोपवण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे यांनी धर्मदाय आयुक्त व संबंधित विभागाकडे केल्याने ग्रामपंचायतीने करोना नियमांचे पालन करीत दोन दिवसांपूर्वी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकिला विश्‍वस्त मंडळ गैरहजर राहिल्याने काल रविवारी पुन्हा विश्‍वस्त मंडळासोबत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी विश्‍वस्त मंडळाचे बापूसाहेब पटारे, भाऊसाहेब कोकणे, रामनाथ सोमाणी, गंगाधर गायकवाड, सचिव नानासाहेब लेलकर उपस्थित होते.

काल झालेल्या बैठकित विश्‍वस्त मंडळाचे सचिव नानासाहेब लेलकर बाजू मांडताना म्हणाले की, देववस्थानचा विकास झाला नसल्याचा आरोप धादांत खोटा आहे. देवस्थानच्या जमिनी खाजगी कसणार्‍यांकडून काढण्यासाठी विश्‍वस्त मंडळाने प्रयत्न केले आहेत. काही जमीन कसणारे विश्‍वस्त मंडळास जुमानत नसल्याने देवस्थानला खंड देत नाहीत. मात्र काही कसणारे गेल्या काही वर्षांपासून एकरी एक हजाराचा खंड देत आहेत. विश्‍वस्त बापूसाहेब पटारे मत मांडताना म्हणाले की, ग्रामस्थ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल असल्याने त्यांच्या चौकशीत आम्ही सर्व विश्‍वस्त राजीनामे देण्यास तयार आहोत. नवीन विश्‍वस्त मंडळ स्थापन करताना जुन्या नव्यांचा मेळ घालून देवस्थानच्या विकासासाठी नवीन उमेदिचे विश्‍वस्त मंडळ स्थापन करून जमिनी कसणार्‍याकडून त्या काढून घेऊन लिलाव पध्दतीने वाटप करण्यात याव्यात, असे मत व्यक्त केले.

बैठकित उपसरपंच कान्होबा खंडागळे, अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, माजी सरपंच मंजाबापू थोरात, शिवाजी शिंदे, ग्रा. पं. सदस्य मयुर पटारे, प्राचार्य जयकर मगर, राजेंद्र देवळालकर, विश्‍वस्त मंडळाचे भाऊसाहेब कोकणे, रामनाथ सोमाणी यांनी चर्चेत भाग घेतला. देवस्थानची जमीन कसणार्‍या शेतकर्‍यांकडून काढून घेऊन देवस्थानच्या ताब्यात देण्यासाठी ग्रामपंचायत पाहिजे ते सहकार्य करण्यास तयार असल्याचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी पुन्हा सांगितले. यावेळी अशोकचे संचालक दत्तात्रय नाईक, भाऊसाहेब पटारे, गणेश कोकणे, गोटुराम दाभाडे, विलास दाभाडे, बंडू नागले, आदी उपस्थित होते.

विश्‍वस्त मंडळाने दोन पुजार्‍यांमधील वाद मिटवण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. वास्तविक वंशपरंपरागत पुजारी म्हणून भागवत देवळालकर कुटुंबाचाच मान आहे. असे असताना त्यांच्याकडे देवस्थानची फक्त पाच एकर जमीन आहे. तर दुसरे पुजारी दत्तात्रय देवळालकर कुटुंबाकडे सुमारे सव्वीस एकर जमीन असतानाही ते नेहमीच वाद उपस्थित करीत आहेत. त्यामुळे पुजार्‍याकडेही असणार्‍या जमिनी काढून घेऊन त्यांना पुजारी म्हणून मानधन द्यावे किंवा पुजा आर्चा व दिवाबत्तीसाठी त्यांना 5-5 एकर जमीन कसण्यासाठी द्यावी, अशीही चर्चा यावेळी करण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com