... तर ग्रामपंचायत पदाधिकारी आमरण उपोषण करणार

टाकळीभान विठ्ठल देवस्थान चौकशी प्रकरण
... तर ग्रामपंचायत पदाधिकारी आमरण उपोषण करणार

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

येथील विठ्ठल देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात यावे व देवस्थानची सुमारे 89 एकर बागायत जमीन कथीत कुळांकडून काढून घेऊन नवीन विश्वस्त मंडळाच्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. या मागणीत सहभागी होऊन ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी धर्मादाय आयुक्तांना निवेदन देऊन 19 जुलैपर्यंत कार्यवाही करावी अन्यथा त्यानंतर धर्मदाय आयुक्त कार्यालयासमोर सरपंच, उपसरपंच व सदस्य बेमुदत आमरण उपोषण करतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे यांनी गेल्या तीन महिन्यापूर्वी येथील विठ्ठल देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे व कथीत कुळाकडील जमिनी काढून घेऊन त्या नव्याने निर्माण केलेल्या विश्वस्त मंडळाच्या ताब्यात देण्यात याव्यात अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. त्यावर तीन महिन्यांत कारवाई न झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी धर्मादाय उपायुक्त अहमदनगर यांची नुकतीच भेट घेऊन ग्रामपंचायतीच्यावतीने निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीने शिंदे यांच्या मागणीला थेट पाठिंबा दर्शवला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, शिंदे यांनी विठ्ठल देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात यावे. देवस्थानची 89 एकर जमीन नव्याने निर्माण झालेल्या विश्वस्त मंडळाच्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे. त्यासंदर्भाने ग्रामपंचायतीने ग्रामस्थ व विश्वस्त यांच्या दोन बैठका घेऊन चर्चा केली आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्य मंडळाच्या 26 जून रोजी झालेल्या बैठकितही याबाबत चर्चा झाली आहे. त्यानुसार विश्वस्त मंडळ बरखास्त करावे व कथीत कुळांकडील जमिनी काढून घेऊन नव्याने निर्माण होणार्‍या विश्वस्त मंडळाच्या ताब्यात देण्यात याव्यात.

याबाबत बैठकित चर्चा झाल्याने आपल्या कार्यालयाकडून याबाबतची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. ही चौकशी जास्त काळ प्रलंबित न ठेवता 19 जुलै 2021 आषाढी एकादशीपर्यंत ही कारवाई करण्यात यावी. अन्यथा आषाढी एकादशीनंतर कोणत्याही दिवशी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य आपल्या अहमदनगर येथील कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण सुरू करतील व त्याच्या होणार्‍या परीणामांची जबाबदारी आपणावर राहील, आसा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रलंबीत प्रश्नात थेट उडी घेतल्याने विश्वस्त, कथीत कुळ व ग्रामस्थांच्या नजरा या कारवाईकडे लागल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com