
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
वाढत्या उष्म्याने अंगाची काहीली होत असल्याने टाकळीभान टेलटँकमध्ये (Taklibhan Teltank) मित्रांसोबत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका नवशिक्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू (Youth Death by Drowning) झाला. सुदैवाने आणखी एकाला वाचवण्यात तिसर्या मित्राला यश आले.
टाकळीभान टेलटँकमध्ये (Taklibhan Teltank) सुमारे 65 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने उन्हात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरीक दररोज टेलटँकचा (Taklibhan Teltank) आश्रय घेतात. रविवारी दुपारी येथील स्वराज सुरेश कोकणे (वय 18) हा आपल्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी टेलटँकवर गेला होता. स्वराज व त्याचा एक मित्र पोहणे शिकत होते तर तिसरा मित्र पोहण्यात तरबेज होता. त्यामुळे त्यांनी हवेची एक ट्युब सोबत नेली होती. मेन गेटच्या बाजुने पाण्याची खोली जास्त असल्याने हे तिघेही सांडव्याच्या बाजुने उथळ पाण्यात पोहण्यासाठी गेले.
मात्र सांडव्याच्या बाजुने टेलटँकमधुन मोठ्या प्रमाणात गौण खनिज मुरुमाचा उपसा झाल्याने खोलवर खड्डे झाले आहेत. या तरुणांना नेमका या खड्यांचा अंदाज आला नाही. अचानक तोल जावुन ते 20 ते 22 फुट खोलीच्या खड्यात पडले. पोहण्यात तरबेज असलेल्या तिसर्या मित्राने एकाला तातडीने पाण्यातुन बाहेर काढले. मात्र त्याला बाहेर काढण्यात त्याचा वेळ गेल्याने स्वराज पाण्यात बुडाला. या घटनेने घाबरलेल्या दोन्ही मित्रांनी पाण्याबाहेर येवुन आरडाओरड केल्याने शेजारी मदतीला धावले. मात्र तोपर्यंत खूप वेळ झाला होता. ही वार्ता गावभर पसरताच नागरीकांनी टेलटँककडे धाव घेतली. जलतरणपटु रावसाहेब बनकर यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बराच वेळ पाण्यात शोध मोहीम सुरु होती. सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.
प्राईड अकडमीच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश (बापु) गोपिनाथ कोकणे यांचा स्वराज हा एकुलता एक मुलगा होता. श्रीरामपूर शहरात ही वार्ता पसरताच तहसिलदार प्रशांत पाटील, आ. लहु कानडे यांचे बंधु अशोक कानडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पा. नाईक, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस माऊली मुरकुटे, अॅड. समिन बागवान यांनी घटनास्थळाकडे धाव घेवुन घटनेची पाहणी केली. तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार बोरसे, टाकळीभान दुरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी घटनास्थळावर ठाण मांडून होते. श्रीरामपूर नगरपालिकेच्या आग्नीशामक दलाच्या कर्मचार्यांनी शोध मेहीमेत सहभाग घेतला.