टाकळीभान टेलटँक भरल्याने बळीराजा सुखावला

टाकळीभान टेलटँक भरल्याने बळीराजा सुखावला

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान पंचक्रोशीची शेती फुलविलेला व नागरिकांची तहान भागवून परिसरासाठी जीवनदायी ठरलेला टाकळीभान टेलटँक (गोविंद सागर) पूर्ण क्षमतेने भरला गेल्याने परिसरातील बळीराजा सुखावला आहे.

भंडारदरा धरणाच्या निर्मितीनंतर टाकळीभान व परिसरातील शेती कालव्याच्या पाण्याने सिंचनाखाली आली होती. या अवर्षणग्रस्त पट्ट्यात बारमाही सिंचन व्हावे, यासाठी 1972 च्या दुष्काळी परिस्थितीत रीकाम्या हाताला काम देण्यासाठी श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार स्व. गोविंदराव आदिक यांनी टाकळीभानच्या माळरानावर सुमारे 342 एकरावर टेलटँकच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली होती. 97 द.ल.घ.फू. साठवण क्षमता असलेल्या हा टेलटँक भंडारदरा धरणाच्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून भरण्याची व्यवस्था केलेली आहे.

भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण भरून ओव्हर फ्लो झाल्यानंतरच या टेलटँकमध्ये प्रवाह सुरू होतो. टाकळीभान व घोगरगाव येथील सुमारे 3 हजार एकर शेती कालव्याद्वारे सिंचनाखाली आलेली आहे. तर परीसरातील सुमारे आठ गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना टेलटँक परिसरात असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघाला आहे. त्याशिवाय टेलटँकचा पाझर दूरपर्यंत पोहचल्याने शेती सुजलाम् सुफलाम् झाली आहे. टेलटँकच्या निर्मितीनंतर काही अपवादात्मक वर्ष सोडले तर प्रत्येक वर्षी जलसंपदा विभाग टेलटँक भरण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने टेलटँक नेहमीच तुडूंब झालेला आहे.

गेल्या काही वर्षांत जलसंपदा विभागाचे बेलपिंपळगाव सिंचन शाखेचे शाखा अभियंता महेश शेळके व कारेगाव सिंचन शाखेचे शाखा आभियंता रामा निकम, कर्मचारी बाळासाहेब कोकणे व कालवा निरीक्षक बाळासाहेब जपे विशेष परीश्रम घेत पाण्याचा काटकसरीचा वापर करीत असल्याने ऐन उन्हाळ्यातही चांगला पाणीसाठा शिल्लक राहत असून टेलटँक लवकर भरला जात आहे. यंदाही जून महिन्यातच 80 टक्के पाणीसाठा झाला होता. मात्र नुकतीच पाण्याने सांडव्यातून झेप मारल्याने टेलटँक तुडूंब झाला आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने बळीराजा सुखावला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com