45 वर्षांपूर्वी अधिग्रहण होऊनही टाकळीभान टेलटँक जमिनीचे कब्जेदार मूळ मालकच

45 वर्षांपूर्वी अधिग्रहण होऊनही टाकळीभान टेलटँक जमिनीचे कब्जेदार मूळ मालकच

जलसंपदा विभागाचा भोंगळ कारभार

टाकळीभान |वार्ताहर|Takalibhan

तत्कालीन आमदार स्व. गोविंदराव आदिक यांनी टाकळीभानच्या माळरानावर टेलटँक उभारण्याचा लोकोपयोगी निर्णय घेतला होता. शासन दरबारी वजन वापरून जमिनीचे अधिग्रहण व नुकसान भरपाई देण्यात आली. मात्र टेलटँक निर्मितीच्या 50 वर्षानंतरही जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अधिग्रहीत केलेल्या जमिनी अद्यापही मूळ मालकांच्याच नावे असल्याने जलसंपदा विभाग या जमिनीचा मालक झालेला नाही.

1972 च्या भयावह दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी व नागरिकांच्या हाताला काम देऊन तत्कालीन आमदार स्व. गोविंदराव आदिक यांनी येथील माळरानावर टेलटँक निर्मितीचा धाडसी निर्णय घेतला. टेलटँकच्या निर्मितीसाठी लागणारी खाजगी मालकीची जमीन अधिग्रहीत करण्यासाठी शेतकर्‍यांचे समुपदेशन करण्यात आले होते. या परिसरात महाराष्ट्र शासनाची जमीन अधिग्रहणाची प्रक्रियाही राबवण्यात आली होती. भिंतीसह एकूण 375 एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. टेलटँक निर्मितीसाठी लागणारा निधी आणि खाजगी जमीनधारकांच्या अधिग्रहीत करण्यात येणार्‍या जमिनींचा मोबदला देण्यासाठी खर्च होणारा निधी याचीही तरतूद करण्यात आली होती. टेलटँकसाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या जामिनीच्या मोबदल्यात काहींना जमिनीही देण्यात आल्या आहेत.

पाटबंधारे विभागाच्या विविध विभागांकडून याबाबत 1972 साली सर्वेक्षण होऊन 1976 ला या अंतिम तलावाचे काम पूर्ण झाले. 197.18 द.ल.घ.फूट साठवण क्षमतेचा व 4.300 कि. मी. लांबीचा कालवा असलेल्या या तलावाखाली 3 हजार 940 एकर एवढे क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ही सर्व इस्टेट जलसंपदाच्या मालकी हक्काची असल्याने जलसंपदा विभाग 1976 पासून गेली 45 वर्षे पाणीपट्टीच्या स्वरुपात आजतागायत शेतकर्‍यांकडून महसूल गोळा करीत आहे.

तलावात गेलेल्या जमिनीचे अधिग्रहण होऊन व शेतकर्‍यांना मोबदला देऊनही जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आजही या जमिनीवर जलसंपदाची मोहर लागलेली नाही. हे संपूर्ण संपादीत क्षेत्र अजुनही मूळ मालकांच्याच नावावर आहे. त्यामुळे आजही बहुतांश शेतकर्‍यांची नावे रेकार्ड ऑफ राईटला असल्याने ही ईस्टेट जलसंपदाची नसून मूळ मालकांचीच असल्याचे दिसून येत आहे. या सर्व क्षेत्रावर फक्त तळेपड नोंद महसूलच्या दप्तरी दिसून येते.

Related Stories

No stories found.