टाकळीभान टेलटँक झाला 342 एकराचा मालक

जलसंपदा विभागाची 50 वर्षांनंतर टाकळीभान टेलटँकच्या कब्जेदार सदरी नोंद
टाकळीभान टेलटँक झाला 342 एकराचा मालक

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान टेलटँकसाठी सन 1972 साली जमिनीचे अधिग्रहण होऊनही अधिग्रहीत केलेल्या जमिनींची रेकार्ड ऑफ राईटला मूळ मालकांचीच नोंद असल्याने 45 वर्षांनंतरही जलसंपदा विभागाची टेलटँकच्या जमिनीच्या कब्जेदार सदरी नोंद नव्हती. दै. सार्वमतने 4 ऑक्टोबर 2021 च्या अंकात, ‘45 वर्षे होऊनही टाकळीभान टेलटँकच्या कब्जेदार सदरी मूळ मालकच’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसिध्द केल्याने महसूल विभागाने या वृत्ताची गंभीर दखल घेतली. त्यांनी हा तिढा सोडवत 342 एकर क्षेत्र जलसंपदाच्या नावे केल्याने टाकळीभान टेलटँक आता 342 एकराचा अधिकृत मालक झाला आहे.

श्रीरामपूर तालुक्याचे तत्कालीन आ. स्व. गोविंदराव आदिक यांनी 1972 च्या दुष्काळात नागरिकांच्या हाताला काम मिळावे तसेच या परीसराचा विकास व्हावा, या हेतूने 97 द.ल.घ.फू. पाणी साठवण क्षमतेचा टाकळीभान टेलटँक उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. सरकार दरबारी वजन वापरून स्व. आदिक यांनी योग्य साईट निवडून पाणी साठवण क्षमतेच्या प्रमाणात जमिनीचे अधिग्रहण केले होते. या परिसरात सरकारी जमीन मोठ्या प्रमाणात असल्याने या भागातील खाजगी जमीनधारकांना योग्य तो मोबदला देऊन तर भूमिहीन होऊ नये, म्हणून काही शेतकर्‍यांना जमिनीच्या मोबदल्यात जमिनी देऊन त्यांचे पुनर्वसन केले होते.

मात्र जलसंपदा विभागाच्या भोंगळ कामकाजामुळे 50 वर्षांचा कालावधी उलटूनही या जमिनीच्या कब्जेदार सदरी जलसंपदा विभागाची रेकार्ड ऑफ राईटला नोंद झाली नसल्याने जमिनीचे अधिग्रहण होऊनही महसूल दप्तरी कब्जेदार सदरी मूळ मालकांचीच नोंद होती. सुमारे 50 वर्षे टेलटँकवर जलसंपदा विभागाची मालकी असल्याने जलसंपदा विभाग पाणीपट्टीच्या रुपाने लाखो रुपयांचा महसूल गोळा करीत होता. मात्र आधिग्रहण केलेल्या जमिनीच्या कब्जेदार सदरी कोण आहे किंवा अधिग्रहीत झालेली जमीन जलसंपदाच्या मालकीची आहे की नाही हे पान गेली 50 वर्षे जलसंपदाच्या कोणत्याही कर्मचार्‍यांनी अथवा अधिकार्‍यांनी उलटून पाहिले नाही. त्यामुळे हा घोळ 50 वर्षे तसाच लोंबकळत पडला होता.

दै. सार्वमतच्या 4 ऑक्टोबर 2021 च्या अंकात याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिध्द होताच जलसंपदा विभाग खडबडून जागा झाला. श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सार्वमतच्या वृत्ताची गंभीर दखल घेत टाकळीभानचे कामगार तलाठी अरुण हिवाळे यांना या प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आदेश देत तत्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. कामगार तलाठी हिवाळे यांनीही अधिग्रहीत शेतकर्‍यांचे समुपदेशन केले व अधिग्रहीत केलेल्या सुमारे 23 गटांमधील अधिग्रहीत 342 एकर टेलटँकचे क्षेत्र कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अहमदनगर यांच्या नावे करून रेकॉर्ड ऑफ राईटला नोंद केली आहे. त्यामुळे 50 वर्षांनंतर जलसंपदा विभागाची कब्जेदार सदरी नोंद झाली होऊन टाकळीभान टेलटँक खर्‍या अर्थाने 342 एकराचा मालक झाला आहे. सार्वमतने 50 वर्षे प्रलंबीत असलेल्या या प्रश्नाला वाचा फोडून पाठपुरावा केल्याने अनेकांनी सार्वमतला धन्यवाद दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com