टाकळीभानगमध्ये सत्तेसाठी संख्याबळाचा आटापिटा

टाकळीभानगमध्ये सत्तेसाठी संख्याबळाचा आटापिटा

ग्रामपंचायतीचे राजकारण कलाटणीच्या वळणावर || सदस्यांची गोळाबेेरीज सुरु

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

दीड वर्षांपूर्वी झालेल्या टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीत स्थापन झालेली महाविकास आघाडी फुटीच्या वळणावर आल्याने सत्ता संघर्ष वाढताना दिसत आहे. ग्रामपंचायतीच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. सत्तेसाठी संख्याबळ आवश्यक असल्याने सदस्यांची गोळाबेरीज करण्यासाठी राजकीय धुरीणांचा आटापिटा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

श्रीरामपूर तालुक्यात राजकीय प्रतिष्ठेच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीची सुत्रे माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हाती होती. विकास हा पवारांचा स्थायीभाव असल्याने पहिल्या पाच वर्षांत त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास योजना राबविल्यामुळे दुसर्‍या पंचवार्षिकची सुत्रेही पवारांच्याच हाती गेली. दुसर्‍या पंचवार्षिकमध्ये पूर्ण पाच वर्षे सरपंचपद भुषवणार्‍या सरपंच रुपाली धुमाळ यांच्या तंत्रशुध्द कार्यकाळाचा नागरिकांमध्ये उद्रेक झाला व त्याचा फटका पवारांच्या हातातील सुत्रे निसटण्यात झाला.

कामाच्या माध्यमातून सलग 10 वर्षे सदस्य राहिलेल्या कान्होबा खंडागळे यांनी माजी आ. भानुदास मुरकुटे गटात प्रवेश करून गेल्या निवडणुकीची सुत्रे हातात घेतली. गेली काही दिवस अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांची मोट बांधून ग्रामपंचायत निवडणुकीत सक्षम पर्याय म्हणून सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेवून महाविकास आघाडीची मोट बांधली व निवडणुकीत सत्ताधार्‍यांचा दारुण पराभव करून 17 पैकी 16 सदस्य निवडून येऊन ग्रामपंचायतीत प्रथमच मुरकुटे गटाचा झेंडा लावला.

मात्र या विजयाचा आनंद महाविकास आघाडीला त्यातल्या त्यात मुरकुटे गटाला फार काळ पचविता आला नाही. सत्ता ताब्यात येताच महाविकास आघाडीच्या सदस्यांमध्ये व त्यांच्या नेत्यांमध्ये मानापमान नाट्य वाढीस लागून अडगळीत पडलेले कार्यकर्ते थेट नेते झाल्याने व त्या नेत्यांचा कामकाजात हस्तक्षेप वाढल्याने अंतर्गत खदखद सुरु झाली. त्याचा थेट परीणाम विकास कामावर झाला आहे. सरपंच व उपसरपंच दोन्ही पदे मुरकुटे गटाकडे असले तरी एकमेकांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. सरपंच अर्चना रणनवरे यांना मुरकुटे गटाचे समर्थन आहे तर उपसरपंच कान्हा खंडागळे यांना महाविकास आघाडीतील इतर घटकांचे समर्थन आहे.

महाविकास आघाडीत ससाणे गटाचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर मुरकुटे गटाचे बारा सदस्य आहेत तर केवळ एक सदस्य विरोधी पवार गटाचा आहे. सरपंच व उपसरपंच यांचेकडे मुरकुटे गटाचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. उपसरपंच गटाला काँग्रेसच्या तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याचे समर्थन असल्याने उपसरपंच गटाचे संख्याबळ जास्त दिसत आहे. मुरकुटे गटाच्या स्थानिक पातळीवरील धुसफुशीमुळे उपसरपंच खंडागळे यांनी माजी आ. मुरकुटे यांच्याशी असलेला संपर्क कमी करून काँग्रेसचे आ. कानडे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्याशी संपर्क वाढविला आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व बाजार समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरपंच व उपसरपंच गट सावध पावले टाकताना दिसत असले तरी या दोन्ही गटांचा संसार जुळणे अशक्य वाटत असून येत्या काही दिवसांत ग्रामपंचायतीच्या राजकारणाला कलाटणी मिळू शकते, असे आजच्या हालचालीवरून दिसत आहे. उपसरपंच गटाचे समर्थन कमी करून अडचणीत आणण्याची रणनिती सरपंच गटाकडून खेळली जात असल्याचे बोलले जात आहे. संख्याबळासाठी दोन्ही गटांकडून मोठा आटापिटा सुरू असल्याने सदस्यांचा भाव मात्र चांगलाच तेजीत आहे.

टाकळीभानचे सरपंचपद अनु. जाती महिलेसाठी राखीव असून महाविकास आघाडीत प्रभाग क्रमांक 1, 4 व 6 मधील एकुण तीन महीला सरपंचपदाच्या दावेदार असल्याने या तिनही महिलांनी सरपंचपदावर दावा सांगितला होता. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तिन्ही महिलांना समान संधी मिळावी यासाठी 20-20 महिन्याचा कार्यकाळ देण्याचे आश्वासन इतर दोन महिलांना देऊन प्रथम सरपंच म्हणून अर्चना रणनवरे यांची निवड 10 फेब्रुवारी 2021 रोजी केली होती. त्यामुळे त्यांचा 20 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास काही महिने बाकी आहेत. महाविकास आघाडीतील ठरावाप्रमाणे पुढील 20 महिन्यांच्या कालावधीसाठी दुसर्‍या महिलेला सरपंचपदाची संधी देणार का? याकडे आता ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com