टाकळीभान ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ सदस्यांंची धाकधूक वाढली

नाशिक येथे विभागीय आयुक्तांपुढे आज सुनावणी
टाकळीभान ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ सदस्यांंची धाकधूक वाढली

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या मुद्यावरून जिल्हाधिकार्‍यांनी टाकळीभान ग्रामपंचायतीच्या 10 सदस्यांचे सदस्यपद रद्द केले. या निर्णयाविरोधात सर्व सदस्यांनी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या कोर्टात धाव घेऊन आव्हान देत अपिल दाखल केले होते. विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांच्या निकालाला एक महिन्याची अंतरीम स्थगिती दिली होती. आज शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर रोजी हा कालावधी संपत असल्याने आयुक्तांपुढे सुनावणी होत आहे. त्यामुळे त्या दहा सदस्यांची धाकधूक वाढली आहे

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागातील महत्त्वाच्या व राजकीय प्रतिष्ठेच्या 17 सदस्य संख्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या 10 सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केले असल्याने ग्रामपंचायत अधिनियमानुसार हे सदस्य अपात्र असल्याने या सदस्यांचे पद रद्द करावे, अशी मागणी ज्येष्ठ शिवसेना नेते राधाकृष्ण वाघुले यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कोर्टात केली होती. या विवाद अर्जावर जिल्हाधिकारी यांच्या दालनात वेळोवेळी सुनावणी होऊन 30 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या सर्व 10 सदस्यांना सदस्य पदावर राहण्यास आपात्र ठरवत त्यांचे सदस्यपद रद्द करीत असल्याचा निकाल दिला होता.

जिल्हाधिकारी यांच्या निकालाला आव्हान देत या दहा सदस्यांंच्या दोन्ही गटांनी विभागीय आयुक्त यांच्या कोर्टात 2 सप्टेबर 22 रोजी अपिल अर्ज दाखल केले होते. अपिल अर्ज क्रमांक 122/2022 नुसार सविता पोपट बनकर, संतोष अशोक खंडागळे, अशोक लालचंद कचे, दिपाली सचिन खंडागळे, कल्पना जयकर मगर व कालिंदा गायकवाड यांनी तर अपिल अर्ज क्रमांक 123/2022 नुसार अर्चना यशवंत रणनवरे, अर्चना शिवाजी पवार, लता भाऊसाहेब पटारे व सुनील तुकाराम बोडखे असे दोन अपिल अर्ज दाखल केले आहेे.

विभागीय आयुक्तांनी याप्रकरणी अपिलार्थींचे अर्ज मंजूर करून जिल्हाधिकारी यांच्या 30/8/2022 च्या आदेशाला स्थगिती देत याकामी 7 ऑक्टोबर 2022 ला पुढील सुनावणी ठेवली होती. या अंतरीम स्थगिती आदेशाचा कालावधी आज पूर्ण होत आहे. त्यामुळे आज विभागीय आयुक्तांच्या दालनात सुनावणी होणार आहे. आयुक्त काय निकाल देणार याकडे टाकळीभान ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत तर दुसरीकडे त्या दहा सदस्यांची धाकधूक वाढली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com