टाकळीभान ग्रामपंचायतीच्या त्या सदस्यांंना विभागीय आयुक्तांकडून ‘तारीख पे तारीख’

टाकळीभान ग्रामपंचायतीच्या त्या सदस्यांंना विभागीय आयुक्तांकडून ‘तारीख पे तारीख’

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या मुद्यावरुन टाकळीभान ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांविरोधात दाखल केलेल्या विवाद अर्जाचा जिल्हाधिकारी यांनी निकाल देत या सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्याने या सदस्यांनी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या कोर्टात धाव घेत जिल्हाधिकार्‍यांच्या निकालाला आव्हान देत अपिल केले होते. विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांच्या निकालाला एक महिन्याची अंतरीम स्थगिती दिली होती. मात्र दि. 7 ऑक्टोबरनंतर काल दि. 4 नोव्हेंबर व आता दि. 2 डिसेंबर रोजी सुनावणी ठेवल्याने या कामी ‘तारीख पे तारीख’ चा सिलसिला सुरू असल्याची चर्चा झडत आहे.

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागातील महत्त्वाच्या व राजकिय प्रतिष्ठेच्या 17 सदस्य संख्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या 10 सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केले असल्याने ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी ज्येष्ठ शिवसेना नेते राधाकृष्ण वाघुले यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कोर्टात केली होती. या विवाद अर्जावर जिल्हाधिकारी यांच्या दालनात वेळोवेळी सुनावणी होऊन नुकताच 30 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या सर्व 10 सदस्यांना सदस्य पदावर रहाण्यास आपात्र ठरवत त्यांचे सदस्यपद रद्द करीत असल्याचा निकाल दिला होता.

जिल्हाधिकारी यांच्या निकालाला आव्हान देत या दहा सदस्यांंच्या दोन्ही गटांनी विभागीय आयुक्त यांच्या कोर्टात दि. 2 सप्टेंबर 2022 रोजी अपिल अर्ज दाखल केले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांच्या वकिलांकडून तोंडी युक्तिवाद करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती मागण्यात आली होती. त्यानुसार विभागिय आयुक्तांनी दि. 7 ऑक्टोबरपर्यंत सदस्यांच्या अपात्रतेच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती देत जैसे थे परीस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दि. 7 ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. यादिवशी सुनावणीचे कामकाज न झाल्याने सुनावणीची पुन्हा दि. 4 नोव्हेंबर ही पुढील तारीख देण्यात आली होती. त्यामुळे काल दि. 4 नोव्हेंबर रोजी होणार्‍या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र पुन्हा सुनावणी कामी दि. 2 डिसेंबरची तारीख देण्यात आल्याने याप्रकरणी केवळ तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू असल्याची चर्चा झडू लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com