कर्जफेडीसाठी पुढाकार घ्या

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत आवाहन
कर्जफेडीसाठी पुढाकार घ्या

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये जिल्हा बँकेचे योगदान मोठे आहे. साखर कारखाने, दुध संघ हे बँकेमुळे उभे राहू शकले. मागील वर्ष साखर कारखानदारीसाठी अडचणीचे होते. यंदा साखरेला चांगला भाव मिळत आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या कर्ज फेडीसाठी कारखान्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच बँक प्रशासन व संचालक मंडळाने बँकेच्या वसुलीकडे लक्ष द्यावे, अशी सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

जिल्हा बँकेची ६४ वी सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. सभेला मंत्री थोरात यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. चेअरमन उदय शेळके, व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे, संचालक अण्णासाहेब म्हस्के, भानुदास मुरकुटे, शिवाजीराव कर्डिले, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, करण ससाणे, अंबादास पिसाळ, राहुल जगताप, गणपत सांगळे, प्रशांत गायकवाड, अमोल राळेभात, माजी चेअरमन बाजीराव खेमनर, रामदास वाघ, अनुराधा नागवडे, सचिन गुजर, काकासाहेब ताकपिर यांच्यासह सीईओ रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री थोरात यांनी जिल्हा बँके आणि करोनामुळे सावध होण्याची गरज, याची आठवण संचालकांना करून दिली. करोनाची काळजी घ्या. तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. नगर जिल्हा व केरळ राज्यात रुग्ण वाढ दिसून येत आहे. यामुळे दुसऱ्या वर्षी बँकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घ्यावी लागत असल्याचे महसूल मंत्री थोरात म्हणाले.

आगामी आव्हानांचा वेध घ्यावा

पुढील काळाचा वेध घेवून बँकिंग क्षेत्रात काम करावे लागणार आहे. यासाठी बँकेच्या संचालकांनी अभ्यास करावा. सहकारी बँकेबाबत कायदे बदलत आहेत. त्याचाही अभ्यास करावा. विचार मंचाची स्थापना करावी. बँक शेतकऱ्यांची असून यामुळे घडणाऱ्या बदलांचा अभ्यास अगत्याचा ठरतो, असे ना. थोरात म्हणाले.

नफा व भांडवल वाढ

बँकेच्या निधी, ठेवी, खेळते भांडवल व नफ्यात यंदा वाढ झाल्याची माहिती अध्यक्ष उदय शेळके यांनी दिली. कर्जवाटपात वाढ झाल्याने तसेच ठेवीवरील व्याजदरात घट झाल्याने गुंतवणूकीत घट झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. मागील वर्षीच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये नफा ३ कोटी २२ लाखांनी वाढून ४२ कोटी ५४ लाखांवर पोहचला. तर खेळत्या भांडवल १ हजार ४१३ कोटी १८ लाखांच्या वाढीसह १० हजार ७७० कोटी ६३ लाख आहे. ठेवी ८३६४ कोटी ८३ लाखांवर आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com