संगमनेर (प्रतिनिधी) -

करोनाची लाट पुन्हा दुसर्यांदा आली असून अनेक ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे. संगमनेर तालुक्यात ही वाढणारी

रुग्ण संख्या अत्यंत चिंताजनक असून नागरिकांनी निष्काळजीपणा न करता गर्दी टाळत, सोशल डिस्टनचे पालन करावे. मास्कचा वापर करून स्वत:ची काळजी घ्यावी म्हणजे आपली व आपल्या परिवार कोरोना पासून सुरक्षित राहील असे प्रतिपादन महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात कोरोना रुग्ण वाढ बाबत उपाय योजना व लसीकरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. संदीप कचोरिया, डॉ. राजकुमार जर्हाड, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, मुकुंद देशमुख, डॉ. वसीम शेख, डॉ. सुरेश घोलप, महेश वाव्हळ आदी उपस्थित होते,

ना. थोरात म्हणाले की, करोना हे मानव जातीवरील मोठे संकट आहे, मागील करोनाची लाट रोखण्यात प्रशासनाला यश आले. मात्र नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे करोनाची दुसरी लाट आली आहे. आणि रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. वाढलेली रुग्णसंख्या अत्यंत चिंताजनक आहे, नवीन करोनाचे रूपही भयंकर आहे. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मास्कचा वापर, वेळोवेळी हात धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे याचबरोबर गर्दी टाळणे ही गरजेचे आहे. शहरात व ग्रामीण भागात दुकानदारांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये. काही लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करुन घ्यावे.

याचबरोबर तालुक्यात आत्तापर्यंत सुमारे 14 हजार नागरिकांनी लसीकरण केले असून इतरांनीही ते करुन घ्यावे. कारण यामुळे शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढत असून त्याचा करोना रोखण्यासाठी मोठा लाभ होणार आहे. करोना रोखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे यासाठी प्रशासनाने कडक धोरणाचा अवलंब करावा. अशा सूचना देतांना नागरिकांनी जागरूकतेने वागले नाही तर नाईलाजाने लॉकडाऊन करावा लागेल असेही ते म्हणाले.

तर नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, घरोघरी होणारे छोटेखानी समारंभ ही अत्यंत चिंतेची बाब आहे. जास्त माणसे एकत्र येतात आणि त्यामुळे करोनाचा संसर्ग होतो आहे. सध्याचा करोना हा संसर्ग नव्या रूपाने पसरू पाहतो आहे. म्हणून आपण गर्दीत जाणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणे टाळा असे ही त्या यावेळी म्हणाल्या.

यावेळी प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे म्हणाले, संगमनेर मधील व्यवसायिकांना आपण वेळीच सूचना दिल्या असून त्यांनी आपल्या दुकानाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. आठवडे बाजार ही बंद केले असून नवे निर्बधांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. तालुक्यात तीन नवीन कोविड सेंटर सुरु करण्यात आले असून काही लक्षणे आढळल्यास तातडीने संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले.

विविध गावांमध्ये जनता कर्फ्यु

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाहेरील गावातील नागरिकांशी संसर्ग टाळण्यासाठी तालुक्यातील बोटा, ओझर यांसह सात गावांमध्ये नागरिकांनी स्वयंस्फुर्ती ने जनता कर्फ्यु लावला आहे.