टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे तरुणाने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

मात्र, त्याने आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

संदीप रामदास शिंदे (वय 30) असे आत्महत्याग्रस्त तरुणाचे नाव आहे. संदीप हा येथील खळवाडी भागात आई, वडील, भाऊ, यांचे शेजारी पत्नी व मुलासमवेत राहत असून त्याचे टाकळीमिया -राहुरी कारखाना रोडवर किराणा दुकान आहे. काल शुक्रवारी रात्री संदीप शिंदे हा जेवण करून घरात झोपला होता व रात्री सुमारे 12 वाजे. दरम्यान संदीप घरातून उठून बाहेर गेला. घरात पत्नी व मुलगा झोपलेले होते.

परंतु संदीप बाहेर लघुशंकेसाठी गेला असावा, असे पत्नीस वाटले. परंतु तिने थोडावेळ वाट पाहिली. मात्र, संदीप परत घरात आला नाही. तेव्हा घराशेजारी असलेले सासरे, भाया, दीर यांना ही माहिती दिली. त्यांनी आसपास व गावात शोध घेतला. परंतु संदीप कोठेही आढळून आला नाही. म्हणून त्यांनी घराजवळच असलेल्या विहिरीकडे शोध घेतला असता विहिरी बाहेर त्याची चप्पल दिसली.

एवढ्या रात्री त्यांनी गजाचा गळ टाकून चाचपणी केली. मात्र, रात्रीचा अंधार असल्याने त्यांना त्यात यश आले नाही. परत सकाळी 5 वाजेनंतर पुन्हा प्रयत्न केल्याने त्यांना संदीपचा मृतदेह काढण्यात यश आले. या घटनेची माहिती येथील पोलीस पाटील नामदेव जगधने यांना कळविण्यात आली. त्यांनी तात्काळ देवळाली पोलीस ठाण्यात संपर्क करून पोलिसांना पाचारण केले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरी येथे पाठविण्यात आला. याबाबत राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक पारधी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.