टाकळीमियात उसाला तुरे फुटल्याने शेतकर्‍यांची वाढली चिंता

टाकळीमियात उसाला तुरे फुटल्याने शेतकर्‍यांची वाढली चिंता

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात अनेक शेतकर्‍यांच्या क्षेत्रातील उसाला तुरे फुटल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता उत्पादनात घट होणार असून ऊस तोडणीसाठीही मजूर टाळाटाळ करीत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

टाकळीमिया परिसरात उसाचे मोठे क्षेत्र आहे. या भागात सध्या अनेक कारखान्यांची ऊस तोडणी चालू आहे. यात प्रसाद शुगर, प्रवरा हे कारखाने आघाडीवर आहेत. या व्यतिरिक्त संजीवनी, युटेक, संगमनेर या कारखान्याच्या थोड्या तोडी चालू आहेत. येथील डॉ. तनपुरे साखर कारखान्याने यावर्षी ऊस तोडीसाठी मजुरांची भरती केली नव्हती. परंतु या कारखान्याने दररोज एक हजार टन ऊस तोडणीसाठी मजूर उपलब्ध केले आहेत. अजूनही मजुरांची उपलब्धता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सध्या या कारखान्याला प्रवरा, प्रसाद, अशोक या कारखान्याकडून उसाचा पुरवठा केला जात आहे. सर्वच कारखान्यांचे उसाचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने कारखान्याकडे ज्या शेतकर्‍यांनी उसाची नोंद केली, त्याच शेतकर्‍यांच्या उसाला तारखेवार तोडी दिल्या जात आहेत. मात्र, उसाचे क्षेत्र जास्त असल्याने ऊस तोडणीसाठी उशीर होत आहे. त्यातच अनेक क्षेत्रांतील उसाला तुरे फुटू लागल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. उसाची पूर्ण वाढ झाली तर किंवा ज्या क्षेत्रात जास्त काळ पाणी साचून राहिल्याने उसाला तुरे फुटतात. मात्र, सध्यातरी मोठ्या क्षेत्रातील उसाला तुरे फुटल्याचे दिसत आहेत.

त्यामुळे उसाच्या वजनात घट होईल व ऊस तोडीसाठी मजूर येणार नाही, अशी चिंता शेतकर्‍यांसमोर आहे. तोडणी मजुरांच्या बैलांना वाढे मिळत नाहीत व अनेक मजूर वाढ्यांची विक्री करतात. वाढे कमी निघतात व बैलांना वाढे घेण्यासाठी मजूर शेतकर्‍यांकडे अतिरिक्त पैशांची मागणी करतात. शेतकरीही ऊस तोडीसाठी त्याचीही तयारी नाईलाजाने करतात. त्यामुळे उसाच्या वजनाची घट व अतिरिक्त द्यावे लागणारे पैसे त्यामुळे शेतकर्‍यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com