टाकळीमिया परिसरात पावसाचे थैमान अनेकांच्या शेताला तळ्यांचे स्वरूप

टाकळीमिया परिसरात पावसाचे थैमान अनेकांच्या शेताला तळ्यांचे स्वरूप

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून दररोज पडणार्‍या पावसाने शेतात पाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, त्यावर कहर म्हणून की काय, काल सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसाने उर्वरित पिकांची वाट लावली. सर्व ओढ्या नाल्याला प्रचंड पाणी येऊन ते पाणी शेतात शिरले. त्यामुळे राहिलेल्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला असून सरसकट पिकांचे पंचनामे करून सरकारने एकरी 50 हजार नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

परिसरात गेल्या 15 ते 20 दिवसापासून दररोज पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी शेतात कपाशी, सोयाबीन, तुर, तसेच चारा पिके घास, मका, कडवळ, गिन्नी गवत, आदी पिके घेतली आहेत. काल सायंकाळी 5 वाजता आकाशात प्रचंड काळे ढग जमुन क्षणात पावसाला सुरुवात झाली. प्रचंड मुसळधार व ढगफुटी सदृश्य पाऊस दोन तास कोसळत होता. त्यामुळे या भागातून वाहत असलेल्या नाग ओढा, लेंडी नाला , तसेच राहुरी कारखान्याकडून येणारा ओढा यांना प्रचंड प्रमाणात पाणी आले.

हे पाणी काठ सोडुन आसपासच्या शेतात घुसल्याने सर्व शेताला तळ्याचे स्वरूप आले होते. काही पिके अति पाण्यामुळे वाहुन गेली. कारखान्याकडुन येणार्‍या ओढ्याला प्रचंड पाणी आल्याने त्या पाण्याने शिवेवर राहत असलेल्या सुनिल जुंदरे यांच्या घराला पाण्याने वेढा देऊन पाणी त्यांच्या घरात शिरले. एकंदरीतच सर्व परिसर जलमय झाला. जनावरांचे मोठे हाल झाले. यापरिसरात झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने शेतकर्‍यांना सरसकट एकरी पन्नास हजार रू नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com