टाकळीमिया परिसरात कांदा लागवडीसाठी लगबग सुरू

File Photo
File Photo

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात यंदाच्या रब्बी हंगामात कांदा पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे चित्र असून त्यादृष्टीने शेतकर्‍यांची लगबग सुरू झालेली आहे.

खरीप हंगामात या परिसरात कपाशी, सोयाबीन, तूर व चारा पिके शेतकर्‍यांनी घेतली होती. मात्र, यात कपाशीचे क्षेत्र मोठे होते. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने शेवटच्या काही दिवसांत परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचेे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा सर्वात जास्त फटका कपाशी पिकाला बसला. अनेक शेतकर्‍यांच्या कपाशीत अतिप्रमाणात पाणी साचून राहिले. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक हातचे गेले तर ज्या शेतकर्‍यांच्या जमिनीत जास्त पाणी साचले नाही अशा क्षेत्रातील कपाशी काही प्रमाणात वाचली.

शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील कापूस वेचणी पूर्ण करून नांगरणी केली आहे. मात्र काही शेतकर्‍यांनी उशिरा कपाशी पिकाची लागवड केली होती, अशा शेतकर्‍यांची कापूस वेचणी अंतिम टप्प्यात आली आहे. काही शेतकर्‍यांनी कपाशी पिकातील 5 ते 10 गुंठे किंवा अर्धा एकर क्षेत्रातील कपाशी तोडून त्याठिकाणी कांद्याचे रोप टाकले आहे. मात्र, ज्या शेतकर्‍यांकडे रोप टाकण्यासाठी जागा नाही अशा शेतकर्‍यांनी दुसर्‍याच्या शेतात रोप टाकण्यासाठी जमीन घेतली आहे.

काही शेतकर्‍यांना ऊस तुटून गेल्यावर कांद्याची लागवड करावयाची असून त्यासाठी जो कारखाना लवकर ऊसतोड देईल त्यास ऊस देण्याची धडपड सुरू आहे. ज्यांच्याकडे जास्त जमीन नाही, असे शेतकरी कांदा लागवडीसाठी दुसर्‍या शेतकर्‍यांकडून ठराविक रक्कम देऊन कांदा लागवड करणार आहेत. एकूणच आता या परिसरात कांदा लागवड क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com