टाकळीमिया परिसरात कांदा लागवडीची लगबग

टाकळीमिया परिसरात कांदा लागवडीची लगबग

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात कांदा लागवडीची लगबग सुरू असून सर्वत्र कांदा लागवड सुरू असल्याने कांदा लावणीसाठी मजुरांची प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक शेतकरी कांदा पिकाकडे वळाले असून शेतकर्‍यांनी कांदा लागवडी साठी रोपे तयार केली आहेत. कपाशीचे पिक घेऊन शेतीची नांगरट,रोटाव्हेटर मारून शेत तयार केले जात आहे. अनेक शेतकरी आपले शेत कांदा लागवडीसाठी दुसरे शेतकरी अथवा अन्य लोकांना कांदा लावणीसाठी एकरी 25 हजार रुपये घेऊन देत आहेत तर काही शेतकरी जास्तीचे रोपांची विक्री करीत आहेत.

ज्या शेतकर्‍यांचे रान पूर्ण बांधून झाले आहे. त्यांना कांदा लागवडीसाठी मजूर वेळेवर मिळत नसल्याने प्रतीक्षा करावी लागत असल्याने लागवड उशिरा होत आहे. एकूणच या परिसरात कांदा लागवडीने चांगलाच जोर धरला आहे. टाकळीमिया परिसरात यावर्षी सुमारे 500 ते 600 हेक्टर लागवड होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात कायम ढगाळ वातावरण राहिल्याने याचा फटका कांदा रोपांना बसला असून रोपांचे शेंडे करपून पांढरे पडल्याने रोपांची वाढ खुंटली. तर काही रोपांना मुळकूज झाल्याने ते कोलमडून पडले आहे. यासाठी शेतकर्‍यांना अनेक महागड्या औषधांची फवारणी केल्याने मोठा आर्थीक खर्च सहन करावा लागत आहे.

शेत नांगरून पूर्ण शेत तयार करून कांदा रोप टाकणे व त्याची लागवड करणे यासाठी मोठा खर्च करून पीक बहरल्यावर येणार्‍या नैसर्गिक संकटांचा सामना शेतकर्‍यांना मागील काही वर्षांपासून करावा लागत आहे.

Related Stories

No stories found.