
टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गावासाठी 9 कोटी 27 लाख रुपये खर्चून मुसळवाडी तलावातून पाणी घेऊन योजना पूर्ण करण्यात आली.मात्र मुसळवाडी तलावातून येणारे पाणी पिण्याच्या लायकच नाही व कुणीही हे पाणी पित नाहीत. त्यामुळे ही योजना पूर्णपणे फसलेली आहे व या गावासाठी मुळाधरणातून थेट पाणी मिळावे, ही ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. या अनुषंगाने आमदार लहू कानडे पाणीयोजनेचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यांच्यासमोर ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यानुसार टाकळीमिया गावाला मुळाधरणातून पाणी मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगून या योजनेच्या जलजीवन प्राधिकरण अधिकार्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
एवढा निधी खर्च करुनही लोक पाणीच पीत नाहीत तर ही योजना गावाने ताब्यातच कशी घेतली? तर अधिकार्यांनी ग्रामसभेचा ठरावच नाही तर ही योजना गावाच्या माथी मारलीच कशी? असा सवाल करून ही योजना चुकीच्या पद्धतीने राबवून बेकायदेशीर पणे हस्तांतरीत करून 420 अंतर्गत गुन्हा होईल असे वर्तन केल्याचे त्यांनी अधिकार्यांना सुनावले. आता ग्रामस्थांची पाणी मिळण्याची मागणी आहे. ते मिळण्यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचे सांगून टाकळीमिया योजनेसाठी मुळाधरणातून कालव्याद्वारे पाणी येते व तेच मुसळवाडी व नऊ गावच्या योजनेसाठीही येते. त्यामुळे आता या दोन्ही योजनांसाठी मुळा धरणातून पाणी आणून मुसळवाडी योजनेलाही यात समाविष्ट करावे या दोन्ही योजनेसाठी धरणातून पाणी आणण्यासाठी त्या पद्धतीने इस्टीमेंट करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या. दरम्यान मुसळवाडी व नऊ गावच्या पाणी योजनेतील त्रुटी व शुद्धीकरणासाठी निधी मंजूर केल्याचे सांगून अधिकारी व ठेकेदार हे कामचुकारपणा करतात अशा लोकांची गय केली जाणार नाही असे सांगून त्यांनी टाकळीमिया योजनेच्या शुद्धीकरण केंद्र व पाण्याच्या टाक्यांची पहाणी केली.
दरम्यान, वाढती लोकसंख्या व त्यासाठी गावाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने ही योजना जलस्वराज्य टप्पा नं.2 अंतर्गत मंजूर होऊन या योजनेसाठी 9 कोटी 27 लाख रुपये मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली.मात्र ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमत करून चुकीच्या पाईपलाईन व टाक्या बांधून तसेच चुकीची शुद्धीकरण टाकी बांधली. मात्र या योजनेवर एवढा मोठा खर्च करून नळाद्वारे येणारे पाणी पिण्याच्या लायकीचे नसल्याने ते कुणी तोंडातही घालत नाही. त्यामुळे ही योजनाच फेल झाल्याची जाणीव नागरिकांना झाली. एवढे होऊनही हे पाणी संपूर्ण वाड्या वस्त्यांवर पोहचलेच नाही. त्यासाठी या योजनेला पुरक वाढीव 5 कोटी 24 लाखांचा निधी मिळवला परंतु, हा निधी मिळूनही पाणी तेच राहणार असल्याने तो निधी नाकारून थेट मुळाधरणातून पाणी मिळावे, यासाठी ग्रामसभेत मागणी करण्यात आली.
हे सर्व चालू असताना वाड्या वस्त्यांवर पाणी पोहचण्यासाठी मोरवाडी, फसलेवस्ती, सोनवणेवस्ती व फैलचाळ येथील लोकसंख्या गृहीत धरून जिल्हापरिषद मार्फत 1 कोटी 72 लाखांचा निधी उपलब्ध केला होता. परंतु, ग्रामसभेने हाही प्रस्ताव फेटाळून मुळा धरणातून पाण्याची मागणी कायम ठेवली. यावेळी सरपंच विश्वनाथ निकम, उपसरपंच किशोर मोरे, अॅड. रावसाहेब करपे, रवींद्र मोरे, शिवशंकर करपे, सुभाष करपे, बाळासाहेब जाधव, ज्ञानदेव निमसे, सुरेश भानुदास करपे, सुभाष जुंदरे, गिरीश निमसे, शिरीष निमसे, रमेश सोनवणे, राघू करपे, योगेश करपे, अमीर शेख, श्रीरामपूरचे प्राधिकरण अधिकारी श्री. निकम, राहुरी पंचायतीचे अधिकारी श्री. परदेशी, ग्रामविकास अधिकारी बी. जी निमसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.