टाकळीमियात मुलीला नांदायला नेण्यावरून हाणामारी; तीन जखमी

टाकळीमियात मुलीला नांदायला नेण्यावरून हाणामारी; तीन जखमी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

मुलीला नांदायला घेऊन जाण्याच्या कारणावरून पाच जणांनी मिळून तिघाजणांना लाकडी दांडा व फरशीच्या तुकड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना दि. 15 ऑगस्ट रोजी राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे घडली.

रवींद्र बाबासाहेब जगधने, रा. टाकळीमिया, ता. राहुरी या तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान जगधने हे त्यांच्या घरासमोर असताना तेथे आरोपी आले. तेव्हा ते जगधने यांची भाची कल्याणी हिला म्हणाले, तू आत्ताच्या आता आमच्या सोबत नांदायला चल. तेव्हा कल्याणी त्यांना म्हणाली, माझी तब्येत बरी नाही, मी चार-पाच दिवसांनी येते. असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला. त्यांनी शिवीगाळ केली. त्यावेळी जगधने व त्यांचे वडील बाबासाहेब हे त्यांना समजावून सांगत असताना आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडा व फरशीच्या तुकड्याने मारहाण करून जखमी केले. आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

जगधने यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी सदानंद संभाजी चव्हाण, ईश्वर संभाजी चव्हाण, संभाजी दयानंद चव्हाण, देवानंद शिवाजी चव्हाण सर्व रा. चव्हाण वस्ती, ता. नेवासा या चारजणांवर गुन्हा रजि. नं. 766/2022 भादंवि. कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत रवींद्र बाबासाहेब जगधने, बाबासाहेब काशिनाथ जगधने व कल्याणी सदानंद चव्हाण हे जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष राठोड करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com