टाकळीभान येथे ऑर्केस्ट्रात दगडफेक; यात्रोत्सवाला गालबोट

प्रेक्षकांची पळापळ, 18 जणांवर गुन्हा, धरपकड
टाकळीभान येथे ऑर्केस्ट्रात दगडफेक; यात्रोत्सवाला गालबोट

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान येथे दोन दिवस सुरू असलेल्या शंभू महादेवाच्या यात्रोत्सवात काल मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या दरम्यान ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम सुरू असताना काही समाजकंटकांनी अंधाराचा फायदा घेत कार्यक्रम स्थळाच्या बाजुने दगडफेक केल्याने प्रेक्षकांची पळापळ झाली. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी तातडीने दगडफेक करणार्‍या समाजकंटकांना तत्काळ ताब्यात घेतले. या प्रकारामुळे मात्र यात्रोत्सवाला गालबोट लागले आहे.

टाकळीभान येथील शंभो महादेवाचा यात्रोत्सव दरवर्षी दिमाखात पार पाडला जातो. दोन दिवस चालणार्‍या या यात्रोत्सवाची तयारी यात्रा समिती महिनाभर मेहनत करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. खास महिलांच्या मनोरंजनासाठी दुसर्‍या दिवशी ऑर्केस्ट्राचे आयोजन केले जाते. कुस्तीचा हगामा मोठा होत असल्याने जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नामवंत मल्ल हजेरी लावत कुस्तीचा आखाडा गाजवतात. यंदाही यात्रोत्सवानिमित्त कार्यक्रमाची रेलचेल होती.

शेवटच्या मानाच्या कुस्तीसाठी ताई प्रतिष्ठानच्यावतीने रोख 11 हजारांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. दोन दिवस सुरु असलेला हा यात्रोत्सव मोठ्या दिमाखात पार पडत असतानाच रात्रीचा ऑर्केस्ट्रा सुरू असतानाच काही समाजकंटक प्रवृत्तींनी आंधाराचा फायदा घेत कार्यक्रम स्थळाकडे दगडफेक केल्याने पोलीस कर्मचारी, यात्रा कमिटी सदस्य, कलाकार व काही नागरिकांना मार लागल्याने जखमी झाले. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी तातडीने या समाजकंटकांची धरपकड करून ताब्यात घेतले.

या घटनेत सोमनाथ लहानु गांगुर्डे, राहुल अशोक गांगुर्डे, बंडू लहानु गांगुर्डे, अविनाश राजू थोरात, संदीप चंद्रभान गांगुर्डे, सचिन नवनाथ बर्डे, सचिन बाबासाहेब बोरुडे, मंगेश बाळासाहेब पवार व इतर आठ ते दहा आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा रजि. नं. 211/23 नुसार भादंवि कलम 353, 332, 336, 143, 147, 148, 149, 190, 506 नुसार फिर्यादी पोहेकाँ. रवींद्र सुकदेव पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे.

मुठभर समाज कंटकांनी केलेल्या दगडफेकीमुळे चांगल्या प्रकारे सुरु आसलेल्या या भव्य दिव्य यात्रौत्सवाला गालबोट लागले आहे. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे संख्येने मोठ्या असलेल्या महिला प्रेक्षकांची पळापळ झाल्याने काही महिला व मुलेही किरकोळ जखमी झाले आहेत.

संपूर्ण यात्रौत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमेटीचे सदस्य, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर व उपविभागिय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे पो.नि. दशरथ चौधरी, स.पो.नि. अतुल बोरसे व त्यांच्या सहकार्यांनी विषेश परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com