टाकळीभानच्या आठवडे बाजाराने राज्यमार्गाचा श्वास कोंडला

टाकळीभानच्या आठवडे बाजाराने राज्यमार्गाचा श्वास कोंडला

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

करोनाचा कहर कमी झालेला असला तरी फैलाव रोखण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून आठवडे बाजारवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बंदी असली तरी काल सोमवारी श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गाच्या दुतर्फा व्यापारी व ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याने दुपारपर्यंत राज्यमार्गाचाच श्वास कोंडला होता.

करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आठवडे बाजार भरवण्यावर अद्याप बंदी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेले आहे. दर सोमवारी येथील आठवडे बाजार भरत असतो. शेजारच्या खेड्यातील नागरिकांनाही हा बाजार महत्त्वाचा असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. बाहेरून येणार्‍या व्यापार्‍यांचीही संख्या मोठी असते. आठवडे बाजार बंद ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने योग्य नियोजन केले होते. ग्रामसचिवालयासमोर व भाजीपाला बाजारतळावर भाजीपाला विक्रेत्यांनी विक्री न करता फिरती मारून भाजीपाला विक्री करण्याचे आवाहन केले होते.

भाजीपाला बाजारतळाचे दोन्ही बाजूचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. दोन्ही ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी पहाटेपासून तैनात होते. मात्र भाजीपाला विक्रेत्यांनी ग्रामपंचायतीच्या नियोजनाला खंडाळ्याचा घाट दाखवत श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गाच्या दुतर्फा सुमारे एक हजार फूट अंतरापर्यंत दुकाने थाटली होती. खरेदीदारांनीही प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे या वर्दळीच्या राज्यमार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक धिम्यागतीने होत असल्याने राज्यमार्गाचा सकाळपासूनच श्वास कोंडला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com