टाकळीभान येथे प्रभारी राजमुळे ग्रामस्थ त्रस्त तर गावपुढारी सुस्त

किरकोळ कामासाठी नागरिकांंची फरपट
टाकळीभान येथे प्रभारी राजमुळे ग्रामस्थ त्रस्त तर गावपुढारी सुस्त

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या व मोठ्या लोकसंख्येच्या गावात राज्यकर्त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शासकीय कर्मचारी उपलब्ध नसल्याने सर्वच कार्यालयात प्रभारीराज सुरू असून नागरिकांची मात्र वेगवेगळी कागदपत्रे गोळा करताना फरपट होत आहे. नागरिक त्रस्त असले तरी गावपुढारी मात्र ‘ईगो’ जपण्यासाठी सुस्त दिसत आहेत.

तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात जवळपास सर्वच शासकीय कार्यालयात प्रभारीराज गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राजकीय पुढार्‍यांच्या एकमेकातील जिरवाजिरवीच्या राजकारणाचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे. ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ अशी अवस्था सध्या सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे. गेल्या अडीच महिन्यांपूर्वी अतिवृष्टीच्या पंचनाम्यासाठी पैसे घेत असल्याची तक्रार येथील काही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी वरिष्ठांकडे केल्याने कामगार तलाठ्याचे निलंबन झाले.

येथे प्रभारी कामगार तलाठ्याची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील मूळ सजा सांभाळून त्यांना टाकळीभानसाठी आठवड्यातील काही दिवस वेळ द्यावा लागत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठीचे दाखले, शेतकर्‍यांना विविध शासकीय अनुदानासाठी लागणारे उतारे, वृध्द, अपंग, विधवा, परित्यक्तांना व निराधारांना कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी लागणार्‍या सह्या व दाखले यासाठी नागरिकांची मोठी फरपट होताना दिसत आहे.

गेल्या महिन्यापासून ग्रामविकास अधिकार्‍यांच्या बदलीच्या मागणीसाठी रान पेटले आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या एका गटाने बदलीसाठी गटविकास आधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले आहे तर दुसरा गट बदली होऊ नये, यासाठी निकराची झुंज देत आहे. मात्र या जिरवाजीरवीच्या राजकारणात नागरिकांची कुचंबना होत आहे. प्रभारी ग्रामसेवक अद्याप हजरच झाले नसल्याने नागरिकांच्या समस्यांचा डोंगर वाढत आहे. ग्रामस्थांना ग्रामपंचायतीचे दाखले मिळण्यास विलंब होत आहे.

पाणी पुरवठ्याच्या दुरुस्तीसाठी थेट लोकवर्गणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर उमटत असला तरी सत्ताधार्‍यांना त्याचे सोयरसुतक वाटत असल्याचे दिसत नाही. त्यातच दहा सदस्यांवर सरकारी जागेतील मुद्यावरून अपात्रतेची टांगती तलवार असल्याने नागरिकांच्या कामाचा त्या सदस्यांना रस राहिलेला दिसत नाही. मात्र अपात्रतेच्या कारवाईच्या तारखेवर तारीख सुरू असल्याने मुलभूत समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

टाकळीभान सेवा सोसायटीचीही यापेक्षा वेगळी परीस्थिती नाही. निवडणूक याचिकेमुळे आठ वर्षे उलटूनही निकाल लागत नसल्याने सोसायटीवरही गेल्या आठ वर्षांपासून प्रशासकीय राज आहे. आठ वर्षांत निवडणुकीचा निकाल प्रलंबित असल्याने संंचालक होण्यासाठी निवडणूक लढवणारे तीन संचालक तर खुर्चीवर बसण्याआधीच देवाघरी गेले आहेत. आठ वर्षे होऊनही उच्च न्यायालयात लढणार्‍या दोन्ही गटांचा ‘ईगो’ शांत झाला नसल्याने येथील प्रशासकीय राज हटता हटत नसल्याने शेतकर्‍यांना अडचणीचे झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही दोन आरोग्य अधिकारी नियुक्त असताना एक आरोग्य अधिकारी सहा महिन्यांपासून रजेवर असल्याने रुग्णांना सुविधा मिळण्यास अडचणी येत आहेत.

समस्यांचा डोंगर तर विकासाचा अनुशेष निर्माण होत असला तरी सत्ताधार्‍यांचा ‘ईगो’ जागा होत असल्याने प्रशासकीय राजमुळे नागरिकांची मात्र फरपट सुरू असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com