टाकळीभानचा टेलटँक तुडूंब भरून विसर्ग सुरू
सार्वमत

टाकळीभानचा टेलटँक तुडूंब भरून विसर्ग सुरू

पंचक्रोशितील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण

Arvind Arkhade

टाकळीभान|वार्ताहर| takalibhan

टाकळीभानसह पंचक्रोशितील आठ गावांच्या शेतीला वरदान ठरलेला टाकळीभान टेलटँक पावसाचे प्रमाण कमी असतानाही तुडूंब भरून सांडव्यातून पाझर तळ्यात विसर्ग सुरू झाल्याने पंचक्रोशितील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. आ. लहु कानडे यांच्या मार्गदर्शक सुचनांमुळे जलसंपदा विभागाने केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे परीसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

टाकळीभान टेलटँक हा परीसरातील शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला आहे. स्व. माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्या दूरदृष्टीमुळे या टेलटँकची निर्मिती झाली. त्यामुळे परीसरातील शेती हिरवीगार झाली आहे. टेलटँक पूर्ण क्षमतेने भरण्याचा अपवाद वगळता ज्या ज्या वेळी भंडारदरा धरणाचा ओव्हरफ्लो कमी आला त्या त्यावेळी टेलटँक भरला न गेल्याने या परिसरातील शेतीची अवकळा झालेली आहे. त्यामुळे टेलटँक भरण्यासाठी परिसरातील नागरिक अत्यंत जागरुक राहिलेले आहेत.

शेतकर्‍यांच्या पाटपाण्याच्या मुलभूत प्रश्नासाठी आ.लहु कानडे यांनी प्राधान्य क्रमाने लक्ष केंद्रीत केले आहे. जलसंपदा विभागाला मार्गदर्शक सूचना केल्याने जलसंपदाचे कार्यकारी अभियंता गणपत नान्नोर, श्रीरामपूर उपविभागाचे उपकार्यकारी आभियंता योगेश जोर्वेकर, बेलपिंपळगावचे शाखा अभियंता महेश शेळके, कालवा निरीक्षक बाळासाहेब जपे, बाळासाहेब कोकणे यांनी गेल्या वर्षभरापासून टेलटँकच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्याने गेल्या मे महिन्यातही टेलटँकची पाणी पातळी 15 मिटरपर्यंत टिकून होती.

शासकीय नियमाप्रमाणे पाणीपातळी जून महिन्यातच 16.03 मिटरपर्यंत गेल्याने आ. कानडे यांच्याहस्ते जलपूजनही करण्यात आले होते. गेल्या महिन्यात श्रीरामपूर शहरासाठी आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून पाण्याची नासाडी न करता टेलटँकमध्ये सोडण्यात आल्याने पाणीपातळी 17 मिटरपर्यंत जाऊन टेलटँक तुडूंब भरला आहे.

सांडव्यातून पाणी पाझर तलावाच्या दिशेने झेपावल्याने येत्या काही दिवसांत पाझर तलाव फुल्ल होऊन नाल्यावरील बंधारे भरले जाणार असल्याने परिसरातील शेतकरी चांगलाच सुखावला आहे. जलसंपदाच्या सुयोग्य नियोजनाचे कौतुक केले जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com