श्रीरामपूर बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारची दुर्दशा

व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, आडत बाजार बंद ठेवण्याचा व्यापार्‍यांचा इशारा
श्रीरामपूर बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारची दुर्दशा

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा महसूल देणार्‍या टाकळीभान उपबाजाराच्या आवारात चिखल व खड्ड्यांंचे साम्राज्य वाढले आहे. व्यापार्‍यांनी खरेदी केलेल्या मालाची उचल करण्यासाठी वाहने धजावत नसल्याने माल पडून आहे. बाजार समिती व्यवस्थापनाच्या दुर्लक्षपणामुळे व्यापार्‍यांनी आडत बाजार बंद ठेवण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

व्यापार्‍यांच्यावतीने बाजार समितीचे सचिव यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, उपपबाजार आवारात सध्या मोठमोठे खड्डे पडले आहेत. सततच्या पावसाने त्यामध्ये पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याने खरेदी केलेला माल उचलण्यासाठी वाहने धजावत नसल्याने माल गोडाऊनमध्ये पडून आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापार्‍यांच्या या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करीत आहे. उपबाजार आवारात मुरुम किंवा कार्दळ टाकून खड्डे तात्पुरत्या स्वरुपात बुजवावेत. व्यापार्‍यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी कांदा बाजार बंद ठेवण्यात येईल, असा इशाराही व्यापार्‍यांनी निवेदनात दिला आहे.

या निवेदनावर सुभाष ब्राम्हणे, बापूसाहेब नवले, सिताराम जगताप, विजय बिरदवडे, पंकज पटारे, एकनाथ पटारे, रोहीत मिरीकर, ललित कोठारी, नितीन दहे, रविंद्र राशिनकर, गणेश चितळकर, अप्पासाहेब हिवाळे, नानासाहेब पवार, किरण खंडागळे, पवन मिरीकर, दादाराम आघम, शिवाजी धुमाळ आदींची नावे आहेत.

बाजार समितीवर सध्या सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. टाकळीभान उपबाजार आवाराचे काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी वर्षापुर्वीच दिल्या होत्या. मात्र त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासकांची नियुक्ती झाल्याने या कामाला ब्रेक लागला. मोठा महसूल देणारा हा उपबाजार असूनही प्रशासक व्यापार्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकर्‍यांची संस्था असलेल्या या उपबाजारात शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com