टाकळीभान येथे पाच मिनिटाच्या वादळात झाडे, विजेचे खांब, खरीपाची पिके भुईसपाट

टाकळीभान येथे पाच मिनिटाच्या वादळात झाडे, विजेचे खांब, खरीपाची पिके भुईसपाट

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे काल झालेल्या पाच मिनिटाच्या जोरदार वादळी पावसाने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाअभावी चिंतेत असलेला शेतकरी बुधवारी झालेल्या पावसाने सुखावला होता. मात्र आता काल झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी वर्गात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे.

काल गुरूवार दि. 1 सप्टेंबर रोजी वातावरणात दिवसभर उकाडा जाणवत होता. सायं.4 ते 4.30 वाजेच्या दरम्यान दक्षिणेकडून मोठ्या प्रमाणात ढग दाटून आले व काही कळण्याच्या आतच सोसाट्याच्या वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. केवळ 5 मिनिटे या वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. शेतातील उभी असलेली कपाशी, उस, बाजरी, मका आदी पिके भुईसपाट झाली.

त्याचबरोबर ठिकठिकाणी रस्त्यावर मोठेमोठे झाडे पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. लक्ष्मीवाडी परिसरात काही ठिकाणी घरांवर झाडे पडली. शेतबांधावरीलही अनेक झाडे उन्मळुन पडली. महावितरणचे विजेचे खांब काही ठिकाणी पडून विजवाहक तारा शेतामध्ये पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याचबरोबर ग्रामपंचारतीच्या स्ट्रीट लाईटचेही वादळामुळे मोठे नूकसान झाले.

बुधवारी दि. 31 ऑगस्टच्या रात्रीही पावसाने जोरदार बॅटींग केल्याने पाण्यावर आलेल्या खरीपाच्या पिकांना दिलासा मिळाल्याने शेतकरी सुखावला होता. संपुर्ण पावसाळ्यातील हा मोठा पाऊस झाल्याने 87 मि. मि. इतकी पावसाची नोंद झाली होती. मात्र काल दुपारी झालेल्या पाच मिनिटांच्या वादळी पावसाने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आह. या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com