
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
सार्वजनिक बांधकाम विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील श्रीरामपूर-नेवासा फाटा राज्यमार्ग क्रमांक 44 वरील अतिक्रमणे काढण्यास काल सुरूवात केल्याने व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
बाभळेश्वर ते नेवासा फाटा या राज्य मार्ग 44 वरील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जलदगतीने सुरू असून रस्त्याच्या मध्यापासून 50 फूट रस्त्याचे काम केले जाणार आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व्यावसायिकांनी अनेक वर्षांपासून अतिक्रमणे करुन व्यवसाय थाटले होते. राज्यमार्गाचे काम सध्या सुरू असल्याने केलेली अतिक्रमणे काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने काल दि. 21 पासून अतिक्रमणावर हातोडा घातला आहे.
या कामासाठी आ. लहू कानडे यांच्या प्रयत्नातून 144 कोटी निधी मंजूर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूर-नेवासे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. राज्यमार्गावरील बेसुमार वाहतुकीमुळे या राज्यमार्गावर वारंवार अपघात घडत असल्याने राज्यमार्गाच्या दुरुस्तीची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. आमदार कानडे यांनी विधानसभेत आवाज उठवून या रस्त्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नाने महाविकास आघाडीच्या संबंधित नेत्यांकडे निधीबाबत मागणी केली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नितीन गुजरे यांनी दि. 20 व 21 रोजी येथील अतिक्रमण धारकांना अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत. सोमवार दि.24 नंतर जे अतिक्रमण काढणार नाहीत, त्यांचे प्रशासकीय नियमानुसार सरसकट अतिक्रमणे काढली जातील. तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. या कारवाईमुळे राज्य मार्गालगतच्या व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून काही व्यवसायिकांचे व्यवसाय थेट संपुष्टात येणार आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनसाठी ग्रामपंचायतने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे अतिक्रमणाच्या तोडफोडीला मागील ग्रामपंचायत जबाबदार असून या तोडफोडीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून दोन दिवसात पाणीपुरवठा पूर्वरत सुरळीत होईल.
- कान्हा खंडागळे, उपसरपंच
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या मध्यापासून पन्नास फुटाचे अंतर दिलेले आहे. मात्र राजकीय दबाव होत असल्यामुळे सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. सर्वांना सारख्या न्यायाने अतिक्रमणे हटवून राज्यमार्गाचा कोंडलेला श्वास मोकळा करावा. आतिक्रमण काढताना अधिकार्यांनी दुजाभाव करू नये. आन्यथा त्याबाबत आवाज उठवला जाईल.
- संजय रणनवरे, माजी संचालक, टाकळीभान सेवा सोसायटी