टाकळीभानला सरपंचपदाची अनु.जाती महिलेस लॉटरी

तीन महिला स्पर्धेत, सार्वमतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला
टाकळीभानला सरपंचपदाची अनु.जाती महिलेस लॉटरी

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागातील महत्त्वाच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काल तहसील कार्यालयात पार पडली.

या सोडतीत अनु.जाती महिलेची लॉटरी लागल्याने तीन महिला सरपंच पदाच्या शर्यतीत आल्या आहेत. सार्वमतने 26 जानेवारीच्या अंकात आरक्षण सोडतीचा अंदाज व्यक्त करणारे वृत्त प्रसिध्द केले होते तो अंदाज तंतोतंत खरा ठरल्याने अनेकांनी सार्वमतचे अभिनंदन केले आहे.

टाकळीभान ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी लोकसेवा महाविकास आघाडीला कौल देत 17 पैकी 16 जागांवर विजयी केले आहे. निर्विवाद बहुमत महाविकास आघाडीला मिळालेले आसले तरी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

त्यामुळे मागासाचा प्रवर्ग पुरुष, अनु.जाती महीला की अनु.जमाती महिला यापैकी कोणाच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडणार या चर्चेला उधाण आले होते. मात्र दै.सार्वमत प्रतिनिधीने आरक्षणाचा गेल्या 1995 पासूनचा लेखाजोखा तपासून 26 जानेवारी 2021 च्या अंकात टाकळीभानच्या सरपंचपदी अनु जाती - जमाती महिलेची लॉटरी लागण्याची शक्यता या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. काल झालेल्या आरक्षण सोडतीत 1995 पासून आरक्षण न मिळालेल्या अनु.जाती महिलेची लोकसख्येनुसार लॉटरी लागल्याने सार्वमतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.

काल झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग 1 मधील सर्वसाधारण मतदार संघातून विजयी झालेल्या मात्र सरपंच आरक्षणानुसार पात्र असलेल्या छाया योव्हान रणनवरे, प्रभाग 4 मधून अनु.जाती मतदार संघातुन विजयी झालेल्या अर्चना यशवंत रणनवरे तर प्रभाग 6 मधुन अनु. जाती महिला मतदार संघातून विजयी झालेल्या कविता मोहन रणनवरे या तीन महिला सरपंच पदाच्या दावेदार झालेल्या आहेत.

लोकसेवा महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत आसल्याने महाविकास आघाडीचे नेते कोणाच्या गळ्यात माळ टाकतात हे पहावे लागणार आहे. मात्र सरपंच पदी कोणत्याही महिलेची निवड झाली तरी गावगाड्याची धुरा रणनवरे आडनावाकडेच जाणार आहे हे निश्चित.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत युवा नेतृत्व कान्होबा खंडागळे यांनी लोकसेवा महाविकास आघाडीची मोट बांधण्यात मोलाची भूमिका बजावलेली आहे. निवडणुकीच्या आखाड्यातील त्यांचा झंजावात मतदारांना अधिकच भावल्याने कान्हा नावाची लाट सर्वच प्रभागात उसळली होती. त्यामुळे मतदारांनी 10 वर्षांची सत्ता उखडून टाकली. या ऐतिहासिक विजयात खंडागळे यांचा मोलाचा वाटा आसल्याने त्यांनी उपसरपंच पदाची धुरा सांभाळून मतदारांनी विकासाच्या मुद्यावर व्यक्त केलेला विश्वास सार्थकी लावावा असा दबाव स्थानिक पातळीवर आता वाढताना दिसत आहे.

नुकत्याच झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना लोकसेवा महाविकास आघाडीचे प्रमुख व सदस्य पदाची हायट्रीक करणारे ग्रामपंचायत सदस्य कान्होबा खंडागळे म्हणाले, मतदारांनी महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करून निर्विवाद बहुमत देवून एकहाती सत्ता दिली आहे. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत अनु.जाती महिलेला कौल मिळाला आहे. महाविकास आघाडीकडे तीन महिला सरपंच पदासाठी पात्र आहेत. त्यामुळे या तीनही महिलांना पाच वर्षे समान 20-20 महिन्यांची संधी देण्यात येईल तर पाच वर्षे पाच सदस्यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात येईल. लोकसेवा महाविकास आघाडीचे नेते बैठक घेऊन पहिली, दुसरी व तिसरी असा क्रम ठरवून निर्णय घेतील. तिनही महिलांना संधी मिळणार असल्याने निश्चिंत रहावे, असे आवाहन खंडागळे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com