
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व सदस्यांमधील गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण थांबायचे नाव घेत नाही. गेल्या आठ दिवसांपुर्वीच सत्ताधारी मुरकुटे गटाच्या महिला सरपंच व दोन सदस्यांनी बंद पडलेल्या विकास कामांच्या मुद्यावर उपसरपंच गटाचे समर्थन घेऊन मुरकुटे गटाच्या स्थानिक नेत्यांवर पत्रकार परिषद घेऊन आरोप करून मुरकुटेंचा दुसरा गट म्हणून जाहीर केले होते. परंतु आठ दिवसांतच सरपंच व या दोन्ही सदस्यांनी घुमजाव करत उपसरपंच गटाचे समर्थन झुगारून पुन्हा मुरकुटे गटात सामिल झाले असल्याचे जाहीर केल्याने नागरीकांमध्ये चर्चेला उधान आले आहे.
टाकळीभान ग्रामपंचायतीतील महाविकास आघाडीची पूर्ण बहुमताची सत्ता आसतानाही व माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाकडेच सरपंच व उपसरपंच दोन्ही पद असतानाही गेल्या दीड वर्षांपासून अंतर्गत धुसफूस होत आहे. त्यामुळे सत्ताधार्यांमध्ये उभी फूट पडून दोन गट झाल्याने विकास कामांना खिळ बसली होती. सरपंचपदाचा सुमारे 32 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने व विकास कामे थांबल्याने मुरकुटे गटाकडूनच सरपंच अर्चना रणनवरे यांच्या राजिनाम्याची मागणी केली जाऊ लागली होती.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनीही सरपंच रणनवरे यांना सरपंच पदाचा राजिनामा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरपंच रणनवरे व दोन सदस्यांनी बंडाचा पवित्रा घेत उपसरपंच गटाशी हातमिळवणी करून पत्रकार परिषद घेत त्यांच्याच गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर वेगवेगळे आरोप करून विकासासाठी उपसरपंच गटाशी हातमिळवणी केल्याचे व मुरकुटेंचाच दुसरा गट म्हणून कामकाज करणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.
मात्र, केवळ आठच दिवसांत सरपंच रणनवरे व त्या दोन सदस्यांनी घुमजाव करत पुन्हा मुरकुटे गटातच असल्याचा व आमच्या गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांबद्दल गैरसमज दूर झाल्याचे सांगून सरपंच व त्या दोन सदस्यांनी घुमजाव केले आहे. सरपंच अर्चना रणनवरे यांनी उपसरपंच कान्हा खंडागळे गटाशी हातमिळवणी केल्याने रखडलेली विकास कामे त्वरीत सुरू करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा विकास कामांना खिळ बसणार का? हे पहावे लागेल. एकूणच ग्रामपंचायत सदस्य विकास कामांपेक्षा रुसव्या फुगव्याला व जिरवाजिरवीलाच जास्त महत्त्व देत असल्याने गेल्या दीड - दोन वर्षात कुठलीही विकास योजना सुरू होऊ शकली नाही हे वास्तव नागरिक बोलत आहेत.