
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
टाकळीभान ग्रामपंचायतीचे सरपंच व उपससरपंच बदलाची मागणी होत असली, तरी केवळ सरपंच बदलाच्या हालचालींनी वेग घेतला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. विद्यमान सरपंच व उसरपंच पदाचे दोन्ही दावेदार मुरकुटे-ससाणे गटाकडेच असल्याने दोन्ही गटांचा एकत्रित बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. त्याकडे सत्तेतील विरोधी गट व जाणकार ग्रामस्थ बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या या ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच अर्चना रणनवरे या मुरकुटे गटाच्या आहेत. मुरकुटे व ससाणे गटाची नुकतीच ग्रामपंचायतीत युती झाल्याने सत्तेत संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे मुरकुटे-ससाणे गटाकडूनच मुरकुटे गटाच्याच सरपंच अर्चना रणनवरे व विखे गटाचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांच्या राजिनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, उपसरपंच गट वेगळा असल्याने सरपंच अर्चना रणनवरे यांच्या पदाच्या राजिनाम्यासाठी मुरकुटे-ससाणे गटाकडून दबाव वाढताना दिसत आहे. सरपंच अर्चना रणनवरे यांचे पती यशवंत रणनवरे हे अशोक कारखान्याचे संचालक असल्याने राजिनाम्याचा वाद थेट माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या दरबारात गेला आहे. एक व्यक्ती एक पद या संज्ञेप्रमाणे मुरकुटे यांनी सरपंच पदाचा राजिनामा देण्याचे सूचित केले आहे. मात्र, सरपंच रणनवरे यांना विरोधी गटाकडून समर्थन मिळत असल्याने त्यांनी अद्याप सरपंच पदाचा राजिनामा सादर केलेला नाही.
सरपंच पद हे मागासवर्गिय महिलेसाठी आरक्षित असल्याने व या प्रवर्गातील तीन महिला निवडून आलेल्या असल्याने मुरकुटे गटाच्या छाया योहान रणनवरे व ससाणे गटाच्या कविता मोहन रणनवरे या दोन महिला सरपंच पदास पात्र आहे. पदाधिकारी निवडीत तिनही महिलांना पाच वर्षांच्या कार्यकाळात समान संधी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार प्रथम अर्चना रणनवरे यांना संधी देण्यात आली होती. त्यांचा 31 महिन्यांपेक्षा अधिकचा कार्यकाळ पूर्ण झालेला असल्याने इच्छुकांकडून स्थानिक नेत्यांवर दबाव वाढत असल्याने राजिनाम्याच्या मागणीने जोर धरला आसून वरीष्ठ पातळीवरून दबाव वाढताना दिसत आहे.
विरोधी भाजपाच्या उपसरपंच कान्हा खंडागळे गटाकडून सरपंच रणनवरे यांना समर्थन मिळत असल्याने सरपंच अर्चना रणनवरे सध्या राजीनाम्यासाठी द्विधा मनस्थितीत आहेत. भाजपाचे समर्थन घेतले तर त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईलही, मात्र त्यांचे पती यशवंत रणनवरे यांच्या अशोक कारखान्याच्या संचालक पदाचे काय? त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परीस्थिती सरपंच व संचालक असलेल्या रणनवरे दाम्पत्याची झाली आहे. त्यामुळेच झटपट निर्णय होत नसल्याने दोन्ही गटांकडून बैठकांचा जोरदार सिलसिला सुरू आहे. अखेर रणनवरे दाम्पत्य सरपंच पद व अशोकचे संचालक पद यापैकीकोणत्या पदाला जास्त महत्त्व देणार यावरच सर्व काही आवलंबून असल्याने टाकळीभानचे राजकीय वातावरण मात्र, चांगलेच तापलेले पहावयास मिळत आहे.