टाकळीभान परिसरात संततधार पावसाने खरीप पिके धोक्यात, शेतकरी चिंतेत

टाकळीभान परिसरात संततधार पावसाने खरीप पिके धोक्यात, शेतकरी चिंतेत

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

अनेक नैसर्गिक संकटावर मात करीत उभारलेली खरीप हंगामी पिके आता दररोज होणार्‍या संततधार पावसामुळे वाया जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भितीने बळीराजा चिंतातुर झाला आहे.

टाकळीभान परिसरात 15 ते 20 दिवसांपासुन पावसाची जोरदार बँटींग सुरु आहे. खरीप हंगामी पिकांच्या पेरणीला पावसाने ओढ दिल्याने पेरा जवळपास महिनाभर उशिराने झाला होता. त्यानंतर झालेल्या दमदार पावसावर घाईगडबडीत पाच ते सहा दिवसात संपुर्ण शिवार पेरला गेला. खरीपाची पिके चांगली तरारली असतानाच पावसाने पुन्हा ओढ दिल्याने शेतकर्‍यांनी रात्रीचा दिवस करुन पिकांना पाणी देणे सुरु केले होते. त्यात विजेचा नेहमीचा लपंडाव कटकटीचा ठरत होता. मात्र तरारलेली पिके करपण्याच्या अवस्थेत असल्याने त्रास होत असतानाही शेतकर्‍यांनी पिकांना पाणी देणे सुरुच ठेवले होते.

गणपती बप्पांचे आगमन झाले आणि बप्पा पाऊस घेऊन आले. या दहा दिवसात एकही दिवस पावसाने खाडा होवू दिला नाही. खरीप पिके पुन्हा एकदा तरारली आणि त्यातच काही ठिकाणी सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला. औषध फवारणी करुन रोगाचा कसातरी प्रतिबंध केला. मात्र गणपती बप्पाने आणलेला पाऊस पितृपक्षातही सुरुच राहीला आहे. चार पाच दिवसांपासून परिसरात पावसाची संततधार सुरु असल्याने खरीपाच्या सोयाबीन, कपाशी, मका, बाजरी या पिकांना धोका निर्माण झाला आहे.

पिकात पाणी साचुन राहिल्याने पिकांची मुळे सडण्यास सुरुवात झाली आहे. आति पाण्याने कपाशीचे पाते गळु लागले आहेत. सोयाबीन, मका पिकेही यंदा चांगली असली तरी सततच्या पावसाने सर्वच खरीप पिकांना धोका निर्माण झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो कि काय? या धास्तीने शेतकर्‍यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com