टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी ग्रामस्थ आणि व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकितील निर्णयामुळे काल गुरुवार ते गुरुवारपर्यंत गावातील

सर्व व्यवहार बंद ठेवून करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुकारलेल्या जनता कर्फ्युला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणार्यांवर ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई केली.

श्रीरामपूर शहरासह ग्रामीण भागातही करोना विषाणूने थैमान घातले आहे. टाकळीभान येथेही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यातच येथील दोन करोना बाधितांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे.

परीसरातील खेड्यांची ही महत्त्वाची बाजारपेठ असल्याने नेहमीच वर्दळ असते. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी व करोनाची साखळी तोडण्यासाठी दोन बाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर तातडीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत नियमावली तयार करण्यात आली होती. आठ दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार आज गुरुवार पासून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. छोट्या मोठ्या व्यापार्यांनी बंदमध्ये सहभाग घेऊन आपआपले व्यवसाय बंद ठेवून आज पहिल्या दिवसापासून कडकडीत बंद केला आहे. या कालावधीत विनामास्क फिरणार्यांवर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव व कर्मचार्यांनी दंडात्मक कारवाई केली.

सुमारे 70 ते 80 जणांवर दंडाची कारवाई करण्यात आली. कान्होबा खंडागळे मित्रमंडळाने मास्क वापरण्याचे आवाहन करीत मोफत मास्कचे वाटप केले. यापुढे राहिलेल्या सात दिवस व्यापार्यांनी असेच सहकार्य करून करोनाची साखळी तोडून आपले गाव, आपली माणसं वाचवावीत,असे आवाहन केले.