टाकळीभानच्या राजकीय कुरघोड्यात अधिकारी व कर्मचार्‍यांची घुसमट

गावपुढार्‍यांच्या राजकारणाचा गावच्या प्रतिमेला फटका
टाकळीभानच्या राजकीय कुरघोड्यात अधिकारी व कर्मचार्‍यांची घुसमट

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

कधी काळी राजकारणात आदर्श गाव म्हणून ओळख असलेले टाकळीभान हे गाव गावपुढार्‍यांच्या राजकीय कुरघोड्यांनी गाजत असल्याने गावपणाचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. राजकीय कुरघोड्यांमुळे अधिकारी व कर्मचार्‍यांची कामकाज करताना घुसमट होत आहे. त्याचा फटका गावच्या प्रतिमेला बसत असल्याचे वास्तव चित्र सध्या पहावयास मिळत असून सुज्ञ नागरिक चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील लोकसंख्येने मोठे असलेले राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचे गाव म्हणून टाकळीभान गावची तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात ओळख आहे. राजकारणापुरते राजकारण व इतरवेळी समाजकारण हा स्थायीभाव येथील गावपुढार्‍यांचा राहिलेला असल्याने तालुक्यात येथील राजकारण व समाजकारणाचा आदर्श गेली अनेक वर्षे घेतला जात होता. त्यामुळेच तालुक्याच्या नेत्यांचीही या गावावर मेहरनजर राहिल्याने विकासाची घोडदौड अखंडपणे सुरू आहे.

स्थानिक किंवा तालुका पातळीवरील निवडणुकीत सोबत फिरुनही स्वत:च्या गटाची किंवा पक्षाची भक्कमपणे बाजू मांडणारे गाव पुढारीही येथील सुज्ञ मतदारांनी पाहिलेले आहेत. त्यामुळे त्या गावपुढार्‍यांनी राजकारणापुरते राजकारण व इतर वेळी समाजकारण हे तत्व अनुभवले आहे. मात्र आज बदललेल्या राजकीय कुरघोड्यांच्या खेळाने सुज्ञ नागरीक व्यथित होताना दिसत आहे.

गेल्या तीन-चार वर्षांत येथील राजकारणाचा ट्रेंड पूर्णपणे बदलला आहे. राजकारणाला समाजकारणाचा वास राहिलेला दिसत नाही. राजकीय कुरघोड्यांतून केवळ एकमेकांची जिरवाजिरवी होताना दिसत आहे. गावच्या विकासाची मध्यस्ती करणार्‍या ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाचे दोन शकले झाल्याने या दोन्ही गटांनी कुरघोड्यांचा कळस केला आहे. या कुरघोड्यांत विकास रथ तर घट्ट रुतून बसलेलाच आहे मात्र या कुरघोडीच्या राजकारणामुळे शासकीय आधिकारी व कर्मचार्‍यांची कामकाज करताना घुसमट होताना दिसत आहे. राजकीय अपरीपक्व असलेले हे गावपुढारी सत्तेत आल्याने हम करेसो कायदा या पध्दतीचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असल्याचा फटका काही अधिकारी व कर्मचार्‍यांना बसताना दिसत आहे,

ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पाटकरी, कृषी सहाय्यक व इतर कर्मचारी दोन गटांतील कुरघोडीमुळे मोकळेपणाने काम करताना दिसत नाहीत. नुकतेच या कुरघोडीच्या खेळात कामगार तलाठ्यावर निलंबनाची कारवाई झाली तर ग्रामविकास आधिकार्‍यावरही दबाव तंत्राचा वापर वारंवार होत असल्याने ग्रामविकास अधिकार्‍याने थेट राजीनामा दिल्याची चर्चा सध्या सर्वत्र आहे. इतर अधिकारी व कर्मचार्‍यांचीही यापेक्षा वेगळी परीस्थिती नाही.

याच राजकीय कुरघोडीचा फटका शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या सेवा सोसायटीला बसल्याने गेली आठ वर्षे या सोसायटीवर प्रशासकराज सुरू आहे. त्याचा काही अंशी फटका शेतकर्‍यांना बसत आहे. एकेकाळी टाकळीभान गावची सेवा करण्यासाठी आनंदाने तयार असलेले अधिकारी व कर्मचारी आज येथे येण्यास तयार नाहीत हे चित्र आहे. राजकारण व समाजकारणात आदर्श असलेल्या या गावाच्या प्रतिमेला राजकीय कुरघोड्यांनी मोठा फटका बसत असून गावचे गावपण हरवले जात असल्याने सत्ताधार्‍यांनी आता तरी बोध घ्यावा, अशा प्रतिक्रिया सुज्ञ व जुने जाणते नागरीक व्यक्त करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com