टाकळीभानमध्ये आगामी काळात राजकीय भुकंपाची शक्यता

टाकळीभानमध्ये आगामी काळात राजकीय भुकंपाची शक्यता

राजकीय समिकरण बदलणार

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील राजकीयदृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या टाकळीभान येथे गेल्या काही दिवसांपासून राजकीय पटलावर शांतता दिसून येत होती. मात्र कुरघोड्यांची अंतर्गत खदखद सुरुच होती. अशोक कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने शह काटशहाचे राजकारण होताना दिसत आहे.आगामी काळात येथे मोठा राजकिय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असून राजकिय समिकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी माजी सभापती नानासाहेब पवार यांना ग्रामपंचायतीच्या सत्तेपासून बाजुला ठेवण्यासाठी सर्व विरोधक व पवारांसोबत सत्तेत असलेला एक गट यांनी सर्वांनी महाविकास आघाडीची स्थापना करून पवारांना सत्तेत येण्यापासून रोखण्यात यश मिळवले होते. महाविकास आघाडीला मतदारांनी भरभरून कौल देत पवारांना केवळ 17 पैकी एका जागेवरच रोखले होते. महाविकास आघाडीत मुरकुटे गटाचे पारडे जड असल्याने सरपंच व उपसरपंच दोन्ही पदे मुरकुटे गटाने ताब्यात घेत मुरकुटे गटाचा प्रथमच ग्रामपंचायतीवर झेंडा फडकला.

या निवडणुकित मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. मात्र काही महिन्यातच महाविकास आघाडीत अंतर्गत राजकिय कुरघोड्या होऊन दोन तीन वेळा खटके उडाले. तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद असेल किंवा सेवा सोसायटीवर प्रशासकीय मंडळ नेमणूक असेल यातून महाविकास आघाडीत खटके उडालेले पहावयास मिळाले. विठ्ठल देवस्थान जमीन व सदस्यांचे शासकिय जागेतील अतिक्रमण हेही मुद्दे अंतर्गत खटके उडण्यास कळीचे ठरले. त्यामुळे अंतर्गत खदखद काही महिन्यांपासून सुरू असल्याचे दिसून आले. त्यातूनच अशोक कारखान्याच्या एका कर्मचार्‍याला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

अशोक सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षीक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. अशोकचे सूत्रधार माजी आ. भानुदास मुरकुटे यांचा कारखाना निवडणुकीत टाकळीभान गट हा बालेकिल्ला राहिलेला आहे. राजकीय प्रतिष्ठेचा हा गट समजून उमेदवारी देताना या गटाला झुकते माप राहिलेले आहे. यंदाही 21 संचालकांपैकी 6 संचालक टाकळीभान गटातूनच असणार आहेत. त्यामुळे लोकसेवा विकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांची संख्याही मोठी आहे. मात्र येथील अंतर्गत शह काटशहाच्या राजकारणात काही इच्छुकांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे. स्थानिक कुरघोड्यांची वस्तुस्थितीही काही कार्यकर्त्यांनी दस्तुरखुद्द मुरकुटे यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र मुरकुटे यांनी घेतलेल्या निर्णयात बदल होण्याची शक्यता नसल्याने इच्छुकांमध्ये नाराजीची आग धुमसत आहे. निवडणूक अर्ज माघारीचा उद्या मंगळवार हा अंतिम दिवस आहे. त्यामुळे कुरघोडीच्या राजकारणात नाराज झालेल्या इच्छुकांना अशोक उद्योग समुहाचे सूत्रधार श्री. मुरकुटे कोणता मंत्र देण्यात सफल होतात किंवा नाराज इच्छुक काय निर्णय घेतात, यावर या राजकिय भुकंपाचे हादरे अवलंबून असले तरी आगामी काळात कुरघोड्यांनी त्रस्त झालेले इच्छुक व त्यांचे समर्थक राजकिय भुकंपाचा धक्का देणार असल्याचे सांगितले जात असल्याने त्याचा परीणाम राजकीय समिकरणे बदलण्यावर होणार आहे, हे मात्र नक्की.

Related Stories

No stories found.