पुण्याचा पिस्तुल्या सिनेस्टाईल जेरबंद

बस चालकावर रोखले पिस्तूल श्रीरामपूर पोलिसांची कारवाई
पुण्याचा पिस्तुल्या सिनेस्टाईल जेरबंद

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

औरंगाबाद ते शिर्डी मार्गावर बस चालकाला कट का मारला म्हणून कार आडवी लावून बस चालकावर पिस्तूल रोखणार्‍याला सिनेस्टाईल शिताफीने जेरबंद करण्यात आले. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाकळीभान येथे 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते शिर्डी जाणारी बस क्रमांक एमएच 40 बीएल 4180 श्रीरामपूरकडे येत असताना टाकळीभान शिवारात वीट भट्टीजवळ स्विफ्ट कार क्र.एमएच 16 बी 4046 मधील आरोपीने बसला गाडी आडवी लावून स्विफ्ट कारला कट का मारला, या कारणावरून पिस्तूल काढून बस चालकावर रोखले व जीवे मारण्याची धमकी दिली. बसमध्ये प्रवास करत असलेले पो. कॉ. विलास उकिरडे यांनी समय सूचकता दाखवत सदर घटनेची माहिती तात्काळ डीवायएसपी संदीप मिटके यांना दिली. ते तातडीने पथकासह रवाना झाले. टाकळीभान परिसरात कारचा सिने स्टाईल पाठलाग करत स्विफ्ट कार व पिस्तुलासह आरोपी लक्ष्मण शिवाजी आरे (वय 32) रा. गुलटेकडी, मार्केट यार्ड पुणे यास जेरबंद केले.

या घटनेत आरोपी बस चालकावर फायर करण्याची धमकी देत असल्याने बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात बसचालक संजय फ्रान्सिस गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी लक्ष्मण शिवाजी आरे याच्याविरुद्ध गुन्हा क्र.359/2022 भारतीय दंड संहिता कलम 353, 341, 186, 504, 506 शस्त्र अधिनियम 3/25 गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस उपनिरीक्षक. बोरसे, हे.काँ.सुरेश औटी, भारत जाधव, पोकाँ विलास उकिरडे यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com